लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पंतप्रधान खनिजक्षेत्र कल्याण योजनेंतर्गत रेडिओलॉजिस्ट नसतांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयासाठी डिजिटल मॅमोग्राफी मशिन खरेदी केले. सध्या हे मशिन धूळखात पडले असून त्याची चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही भोळे यांनी केला आहे.
याबाबत भोळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली आहे. धरणगाव येथे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मॅमोग्राफी मशिनसंबंधी मागणी नसताना या ठिकाणी विनामागणी डिजिटल मॅमोग्राफी मशिन खरेदी केली. ही मशिन ४४ लाख २३ हजार रुपयांची आहे. या मशिनचा उपयोग हा महिलांच्या स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे असल्यास तपासणीसाठी केला जातो. धरणगाव रुग्णालयात हे मशिन हाताळण्यासाठी रेडिओलॉजिस्ट नाही. तज्ज्ञ उपलब्ध नसताना साहित्य का खरेदी करण्यात आले, असा सवाल देखील भोळे यांनी उपस्थित केला आहे. १८ जून २०२० रोजी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी या मशिन्सचा पुरवठा करण्याचे आदेश नागपूरच्या ठेकेदाराला दिले. त्याचदिवशी पुरवठा केल्याचे दाखवले आहे. त्यानंतर आजपर्यंत एकाही रुग्णाची तपासणी करण्यात आलेली नाही. तसेच हे मशिन निविदेत नमूद मॉडेल आणि कंपनीचे आहे का हे देखील तपासून पाहण्याची मागणी भोळे यांनी केली आहे.
कोविड अन् मॅमोग्राफी मशिनचा काय संबंध?
मॅमोग्राफी मशिन हे कोविड महामारीच्या काळात घेण्यात आले. त्याच आशयाखाली ही खरेदी करण्यात आली. मात्र कोविड १९ आणि मॅमोग्राफी मशिनचा यांचा संबंध नसताना हे मशिन का खरेदी करण्यात आले, असा प्रश्नही त्यांनी आपल्या तक्रारीत उपस्थित केला आहे.
कोणते साहित्य केले खरेदी
एक्स-रे मशिन, डिजिटल २९ लाख ७० हजार
ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, रावेर, चोपडा, धरणगाव १ लाख ८० हजार
डिजीटल मॅमोग्राफी मशिन ४४ लाख २३ हजार
एकूण ७५ हजार ७३ हजार