एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचा ३३वा सरपंच कोण? कासोद्यात उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:05 PM2020-12-25T17:05:22+5:302020-12-25T17:05:55+5:30

एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कासोदा या गावाचा ३३ वा सरपंच कोण होणार याचा निर्णय १७ सदस्य करणार आहेत. याची ग्रामस्थांना उत्सुकता लागली आहे.

Who is the 33rd Sarpanch of the largest Gram Panchayat in Erandol taluka? Curiosity in Kasodya | एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचा ३३वा सरपंच कोण? कासोद्यात उत्सुकता

एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचा ३३वा सरपंच कोण? कासोद्यात उत्सुकता

Next

प्रमोद पाटील
कासोदा : एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कासोदा या गावाचा ३३ वा सरपंच कोण होणार याचा निर्णय १७ सदस्य करणार आहेत. याची ग्रामस्थांना उत्सुकता लागली आहे.
 हे १७ सदस्य एकूण ६ प्रभागातील १८६९१ मतदार येत्या निवडणुकीत करणार आहेत.
पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असलेले हे ४० हजारावर लोकसंख्या असलेले हिंदू आणि मुसलमान थोड्याफार फरकाने समसमान लोकसंख्या असलेले गुण्यागोविंदाने नांदणारे उद्योग प्रिय गाव आहे.
या गावात आजतागायत पॅनल बनवून निवडणूक झाली नाही, यंदादेखील होणार नाही. प्रभागातील तीन किंवा दोन सदस्य जेवढे असतील ते निवडणुकीपुरती युती करतात. नंतर आर्थिकदृष्ट्या शक्तीशाली सदस्य सरपंचपदी विराजमान होतो.
यंदा सरपंचपदाचे आरक्षण सदस्य निवडणुकीनंतर होणार असून व सर्वसाधारण व ओबीसी पुरुष यासाठीच सरपंचपद आरक्षित राहील, असा तर्क लावून होऊ घातलेले सरपंच आपापली व्यूव्हरचना आखून मैदानात उतरले आहेत. तशी ही व्युव्हरचना गेल्या वर्षभरापासून सुरुच होती, पण आता जोरदार सुरू आहे.
 यंदा गावासाठी  पाण्याची योजना होऊ घातली आहे. येत्या महिना दोन महिन्यांत ही योजना सुरू होऊ शकते, त्यामुळे नव्या सरपंचाला पाणीप्रश्न भेडसावणारा नसणार आहे. नेहमी नित्याचेच साफसफाई,  दिवाबत्ती, कर्मचाऱ्यांना पगार, करवसुली यावर ग्रामपंचायतीचे पांच वर्षे निघून जातात. नवे धोरणात्मक मोठ्या कालावधीसाठी गावाच्या हिताचे निर्णय येथे होत नसल्याचे आरोपांबाबत सोशल मीडियातून नव होतकरू तरुणांनी जनजागृती सुरू केली आहे. यात राज्यातील आदर्श ग्रामपंचायती व तेथील सरपंचांचा दाखला देण्यात येत आहे. आपली ग्रामपंचायत जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत ठरावी, यासाठी स्वप्नरंजनदेखील सुरू आहे.
    कासोदा व परिसरात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेती आहे, येथील मोठा वर्ग शेतीवर अवलंबून असून मजिरांची संख्यादेखील उल्लेखनीय आहे. यामुळे "पाणी आडवा पाणी जिरवा" ही मोहीम पोटतिडकीने राबवणारा सरपंच हवा, कारण शेतीसाठी पाणी मिळाले तर गावकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे, मजुरांना दररोज रोजगार मिळणार आहे, यासाठी शासकीय योजनांवर अवलंबून न रहाता गावात जनजागृती, दानशूर व्यक्ती, गावाचेच परंतु शहरातील उद्योजक यांची चांगली मोट बांधून गावशिवारातील शेती बारमाही बागायत कशी होईल, या धारणेने पछाडलेला सरपंच होणे गावाच्या हिताचे राहील, हा मुद्दा या निवडणुकीत प्रभावी असावा, असा काही तळमळीचे जाणकार वातावरणात निर्मिती करीत आहेत. शेतकरी व मजुराकडे शेती उद्योग सक्षम असला तर तो टुमदार बंगला व सर्वसोईंनी युक्त शौचालय व बाथरूम पाहिजे तसे स्वतःच बांधू शकतो, पण शेतीत पाणी नसले तर दहा-वीस हजारांच्या शौचालयासाठीदेखील तो शासनाकडे याचक असतो, अशी वातावरण निर्मिती करीत आहेत.
निवडणुकीत भरसाठ पैसा खर्च करणारा मतदारांना विकाऊ समजतो. लोकांना पैसा हवा असतो, पैसा दिला तरच आपण निवडून येऊ शकतो, हा विचार सध्या सर्वत्र फोफावला आहे. मोठा पैसा खर्च करणारा गावाच्या विकासासाठी झोकून देईल या अपेक्षा नंतर फोल ठरतात, विकासासाठी मतदारांनीच  जाग्रुत होणे अत्यंत गरचेचे आहे, असे मत आता नव्या तरुणांमध्ये व्यक्त होऊ लागले आहे.  
  सध्या प्रत्येक उमेदवार सरपंच समजूनच प्रचारात उतरला आहे. कमीतकमी तीन लाखांपासून तर समोरचा उमेदवार कसा राहील यावर अफाट खर्चाचा बजेट ठरवत आहेत.
   येथे एकूण सहा प्रभाग आहेत, त्यात प्रभाग १मध्ये ३१९८, २मध्ये ३३२०, ३ मध्ये १७६२, ४ मध्ये २८०६, ५ मध्ये २९६३, तर ६ प्रभागात ३६४२ असे एकूण १८६९१ मतदार आहेत.
   दि.१० जुलै १९३५ साली स्थापन या ग्रामपंचायतीच्या प्रथम सरपंचपदाचा मान गुलाबदास भाटिया यांचा आहे, त्यानंतर रामनारायण पांडे, शंकरलाल समदाणी, हा.अकबर अली, रणछोडदास पांडे, अलाऊद्दीन शेख, यशवंत भावे, महादू खैरनार, रामदास पाटील, ल.न.वाणी, हा.मुसा शेख,रमेशचंद्र मंत्री, ज.रा.चंद्रात्रे (प्रशासक), रमेशचंद्र मंत्री, मदनलाल पांडे, हा.अलीमोद्दीन काझी, बबीता पाटील, प्रमीला सुतार, साखरबाई मराठे, आशा चौधरी, अलका पिलोरे, संजय नवाल, शहनाझ बी शेख, सुदाम राक्षे, रफिक शेख, आत्माराम चौधरी, ज्योती पाटील, रत्ना चौधरी, मंगला राक्षे, समदखान, मंगला राक्षे इत्यादी सरपंचांनी गावाची धुरा सांभाळली आहे.
या यादीत यंदा कुणाच्या नावाची भर पडते यासाठी जानेवारी महिन्याची वाट पहावी लागणार आहे.
चार हजारांच्या पुढे घरांची संख्या असलेल्या या गावात ६० लाख रुपयांचे पुढे कर वसूल होतो,.अनेक योजना राबवताना व वित्त आयोगातून लाखो रुपये निधी उपलब्ध होतो, येथे मोठा खर्च पिण्याच्या पाण्याच्या योजनेवर होतो. पाणीपट्टी, इलेक्ट्रीक मोटार पंप जळणे, पाईपलाईन दुरुस्ती, व्हाल्व दुरुस्ती, कर्मचारी पगार, दिवाबत्ती इत्यादी, पण आज फदेखील येथील कर्मचाऱ्यांना पगारापोटी सर्व मोबदला मिळालेला नाही, समाधानाची बाब ही आहे की, होणाऱ्या सरपंचाला पाणी पुरवठ्यावरचा मोठा खर्च करावा लागणार नाही. चांगली कामे करण्यासाठी मोठी संधी काम करणाऱ्या सरपंचाला मिळणार आहे.

Web Title: Who is the 33rd Sarpanch of the largest Gram Panchayat in Erandol taluka? Curiosity in Kasodya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.