विजय पाटील
आडगाव, ता. चाळीसगाव : यावर्षी खरिपावरील संकट कमी न होता अधिक गडद होत चालल्याचे चित्र आहे. सुरुवातीला दडी मारून बसलेल्या वरूणराजाने आता ऐन मोसमात पिकावर प्रमाणापेक्षा जास्त जलाभिषेक केल्याने खरिपातील जवळ जवळ सर्वच पिकांची वाट लागली आहे. महिनाभरापूर्वी एकरी १२ ते १५ क्विंटलपर्यंत उत्पन्नाचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्नच राहिले आहे. यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा संकटात शेतकरी सापडला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील काही गावांतील शेती महापुराने पिकांसकट वाहून गेली तर बऱ्याच शेतकऱ्यांचे गुरेढोरे तसेच घरे पुरात वाहून गेली. शासकीय पंचनामा झाला असला तरी मदतीचा वरचष्मा अजूनही बाकीच आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकरी शासनाकडून मदत कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्याला स्वत:ला स्वावलंबी बनविणाऱ्या कपाशी पिकावरच लाल्या व बुरशीजन्य रोगाने हल्ला केला आहे.
जेमतेम कपाशीची वाढ होऊन अतिपावसाने सदर कपाशी लाल पडून परिपक्व झालेली १५, २० बोंडे (कैऱ्या) फुटून मोकळे होत आहेत तर काही ठिकाणी अतिपावसाने शेतामध्ये पाणी साचून झाडाच्या बुंध्याजवळ बुरशी तयार होऊन कपाशी उपळून निघाली आहे. बऱ्याच ठिकाणी कपाशी फुटली असून, जास्त पाण्यामुळे खालच्या कैऱ्या सडल्या आहेत. काही काळ्या पडल्या आहेत. या कैऱ्या तोडून त्या शेतात एका ठिकाणी टाकून मग त्यातून मजूर लावून कापूस काढला जात आहे. काढलेला कापूस हा कवडीसारखा असल्याने त्याला घरी आणून रोज सकाळी घराच्या बाहेर अंगणात वाळायला टाकला जात आहे. परंतु वरुणराजाची छत्री कायम असून, लगेच पावसाची झडप येताच पुन्हा अंगणात टाकलेला कापूस घरात टाकला जात आहे. घरात पंखा लावून त्याला वाळवण्यासाठी शेतकरी सध्या झाडावरच्या कैऱ्या तोडायच्या. त्या एका ठिकाणी साठवायच्या नंतर त्यातून कापूस काढायचा. तो घरी आणायचा दुसऱ्या दिवशी अंगणात टाकायचा. लगेच पाऊस आल्यास त्याला पुन्हा घरात टाकायचा, असा दिनक्रम चालू आहे. एकंदरीत कापसाची वरात, घरात की दारात असेच चित्र सध्या दिसून येत आहे. गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत खासगी व्यापाऱ्यांनी कुठे नऊ हजार, कुठे साडेआठ हजार तर कुठे साडेसहा ते साडेसात हजारांचा भाव फोडून काटा पूजन करून घेतले; परंतु दुसऱ्या दिवसापासून कवडीचा कापूस असल्याने या काळात बंद करून ठेवला, त्यामुळे शेतकऱ्याला माल विकता येत नाही आला तो कडक उन्हात वाळवण्याशिवाय पर्याय नाही. जेव्हा चांगला माल येईल तेव्हाच खरेदी करू, अशी मानसिकता तरी सध्या खासगी व्यापाऱ्यांची दिसून येत आहे.
यावर्षी कपाशी पिकाचे सर्वत्र अतोनात नुकसान झाले असून, कपाशी लाल व बुरशीजन्य रोग पडून वाया गेली आहे. निम्मे उत्पन्नसुद्धा येणार नाही त्यामुळे लागवडीपासून तर माल निघेपर्यंत मोठ्या प्रमाणावर खर्च शेतकऱ्याला आहे. अजूनही वरुणराजा बरसत असल्याने शेवटी किती उत्पन्न हाती येते याचा काही एक भरवसा नसून शासनाने पूरग्रस्त शेतकरीप्रमाणेच कपाशी लागवड केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाचा पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी आता सर्व शेतकरी करीत आहेत. भारतासह चीन व इतर देशात यावर्षी कपाशी लागवड कमी असून, उत्पन्नदेखील कमी येणार आहे. त्यामुळे यावर्षी ८ ते ९ हजारांपर्यंत भाव राहील, असे तज्ज्ञ मंडळीकडून बोलले जात आहे.