जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीला अजून दीड वर्षाचा कालावधी आहे. साडेतीन वर्षांत ज्यांना काही करता आले नाही, ते नगरसेवक आता कामाला लागल्याचे दिसत आहे. काहींनी आपल्या प्रभागातील मतदारांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तक्रारी असल्यास कळविण्याचे आवाहन केले आहे. यामुळे उशिरा का होईना झोपलेले जागे होत असल्याची कोपरखळी नागरिक मारताना दिसत आहेत. झालेल्या विकासकामांतील उणिवा शोधण्याची मोहीम विरोधकांनी सुरू केल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता दिसत आहे. मध्यंतरी सात नगरसेवकांच्या गटाने आरोग्याच्या प्रश्नावरून नगरपालिकेवर दबाव आणून त्यांच्या प्रभागातील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करून घेतला. आरोग्य विभागाने त्यांच्या प्रभागातील डुकरे पकडून शहरातील इतर प्रभागांत सोडल्याने त्या प्रभागातील नागरिक नगरसेवकांकडे तक्रार करू लागल्याने त्यांची अडचण वाढली. अजूनही मोकाट डुकरांची समस्या जैसे थे असल्याने पालिका पदाधिकाऱ्यांनी जनहिताचा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे नागरिक उघडपणे बोलतात. मतदारांनी पहिल्यांदाच एकाच पक्षाला बहुमतात सत्ता दिल्याने विरोधकही नाही. झालेली चूक उमगली असून ती सुधारण्याची संधी मतदार शोधत असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर होत आहे.
- मोहन सारस्वत