लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : कोकणातील पूरग्रस्तांचे संसार उघड्यावर पडले असून घरातील होते नव्हते ते सारे पुरात वाहून गेले. महाड तालुक्यातील तळीये गावाची स्थिती तर अतिशय भीषण होती. त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने स्वीकारली पाहिजे. महाड तालुक्यासाठी शक्य तेव्हढी जास्तीत जास्त मदत पाठविण्याचे प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी शुक्रवारी लोकमतशी बोलताना दिली.
कोकणातून ते शुक्रवारी जामनेरला परतले. पूरग्रस्तांना आधार हवा आहे, समाजाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून मदत करावी. भाजपच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत पोहचविली जात असल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत आमदार महाजन प्रथम तळीये गावात पोहचले. नैसर्गिक आपत्तीनंतर कोकण सावरत असले तरी पुरामुळे त्यांचे झालेले नुकसान भरून निघणे अशक्य आहे. घरातील अन्न धान्य, पीठ आदी जीवनावश्यक वस्तू पुरात वाहून गेल्याने त्यांचे संसार अक्षरशः उघड्यावर पडले आहे. सुरुवातीला बाहेरून आचारी बोलावून त्यांच्या जेवणाची चांगली व्यवस्था केली. तांदूळ, डाळ, गहू, सोबतच कपडे, चादरी आदी आवश्यक वस्तूंनी भरलेल्या सुमारे १६ ट्रक महाडकडे रवाना केल्या आहे. १० हजार चटईचे तातडीने त्यांना वाटप केले.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात घरात व बाजारपेठेत १० ते १५ फूट पाणी शिरल्याने व्यापारी व सर्व सामान्य नागरिक संकटात सापडले आहे. शासनाने पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने मदत देणे गरजेचे आहे असे महाजन यांनी सांगितले.