भडगाव : अनेकदा मंत्री व अधिकाऱ्यांनी आश्वासने देऊनही जिल्ह्यातील शिक्षकांचे दरमहा पहिल्या तारखेला सोडा, पहिल्या आठवड्याच्या आतदेखील होणे दुरापास्त झाले आहे. यंदाही जुलै संपला तरी जून महिन्याचा पगार न मिळाल्याने भडगाव तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बहुतांश शिक्षकांनी विविध बँका, सोसायट्यांमधून कर्ज घेतले असून, त्याचे हप्ते फेडण्यासाठी विलंब होत आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे पंधरा हजारांपेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत. कोरोनामुळे अनेक शिक्षक व त्यांचे कुटुंबीय बाधित झाल्याने अनेकांच्या वैद्यकीय खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शिवाय नुकतेच शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने शैक्षणिक खर्चही वाढला आहे. अशा परिस्थितीत उशिरा होणाऱ्या पगारामुळे अनेक शिक्षकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
जुलैची शेवटची तारीख उलटली. मात्र, अजूनही पगार न झाल्याने अनेक शिक्षकांवर उसनवारीची वेळ आली आहे. मध्यंतरी शिक्षकांच्या पगारात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून दिला गेला होता. मात्र, या इशाऱ्यानंतरही कार्यवाही झाली नाही. शिक्षकांचे वेतन वेळेवर व्हावे यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाचे स्वतंत्र वेतन अधीक्षकांचे कार्यालय असतानाही शिक्षकांच्या उशिरा होणाऱ्या पगाराचे रडगाणे थांबणार की नाही? हाच सवाल शिक्षक वर्गातून उपस्थित होत आहे.