चंदू नेवे■ जळगाव
सुप्रीम कॉलनीतील श्रीकृष्णनगरात बहुसंख्य घरातील टी.व्ही., फ्रीज, पंखे, ट्यूब, बल्ब इ.विद्युत उपकरणे जळून मोठी वित्तहानी झाली आहे, यामुळे या वस्तीतील सर्वसामान्य रहिवाशी मोठय़ा विवंचनेत आहेत. किती रात्री अंधारात काढाव्या लागतील, आणखी पुन्हा अशी घटना घडली तर चिमणी वा कंदिलच्या प्रकाशात जगावे लागेल की काय?..याची चिंता त्यांना भेडसावत आहे..
क्रॉम्प्टनच्या कारभाराचीच चर्चा संतापयुक्त स्वरात सुरू आहे, असे चित्र 'लोकमत' प्रतिनिधीने या परिसरात फेरफटका मारल्यावर अनुभवाला आले. या भागात शनिवारी सकाळी १0 ते ११ वाजेदरम्यान कमी जास्त दाबाचा वीज पुरवठा होऊन अनेक घरातील टी.व्ही., फ्रीज, पंखे, ट्यूब, बल्ब जळून मोठी वित्तहानी झाली आहे.
सोमवारी दुपारपासून वीज पुरवठा खंडित असल्याने सुमारे ३00 कुटुंबांना डास, अंधार, उकाडा याचा सामना करीत सोमवारची रात्र जागून तळमळत काढावी लागेल की काय?..की बाहेर झोपावे लागेल?..अशी भीतीही त्यांच्या चेहेर्यावर दिसत होती. शनिवारी सकाळी कमी जास्त दाबाने वीज पुरवठा झाल्याने हा प्रकार घडल्याची बोंब होताच ज्यांच्या घरात ही उपकरणे बंद होती, त्यांनी पिन्स काढल्याने, ती उपकरणे सुरू करणे टाळल्याने ती व्यवस्थित राहात त्यांचे नुकसान टळले..जे कामधंद्यानिमित्त घराबाहेर त्यांनीही हा प्रकार कळताच नुकसान टळल्याचा सुस्कारा सोडला, पण अशा घरांची संख्या कमी असल्याचे आढळून आले.
मी फोडली डी.पी.
समोरची डी.पी.मी फोडली आहे, असा दावा रहिवाशांपैकी एका महिलेने अनेकांसमक्ष केला. वर्षापूर्वी अशाच प्रकारे फ्रीज, इलेक्ट्रॉनिक काटा निकामी होऊन आपले १४ हजाराचे नुकसान झाले होते, असा संतापही तिने व्यक्त केला.
दरम्यान या वस्तीत अनेकांनी वीज मीटर न घेता हूक टाकून, वीज चोरी केलेली आहे. यामुळे मंगळवारी वीज मीटर तसेच नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, असे अधिकृत सूत्रांनी 'लोकमत'ला सांगितले.
सोमवारी तक्रार करायला कुणीही आले नाही. 'क्रॉप्टन'च्या कर्मचार्यांनी या भागात जात सोमवारी रात्री ७ च्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी आधी लोडशेडिंग कमी करा असा आग्रह धरत त्यांना परतवून लावले.