लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पोषण नसलेल्या, वजन कमी व शरीरात रक्त अत्यंत कमी असलेल्या चोपडा तालुक्यातील चिंचोली येथील ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी रात्री १० वाजता मृत्यू झाला. मीना दिनेश बारेला, वय २२ असे या महिलेचे नाव असून त्यांना प्रशासनाकडून कुठलीच औषधी, धान्य मिळाले नसल्याची व त्यांची नोंदही कुणी घेतली नसल्याची गंभीर माहिती नातेवाइकांकडून समोर आली आहे. पोषण न मिळाल्याने या महिनाभराच्या कालावधीत आणखी दोन बळी गेल्याचे समोर आले आहे.
मीना बारेला हिचे वर्षभरापूर्वीच लग्न झालेले होते. ती मूळची मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. तिचा पती दिनेश बारेला व त्यांचे कुटुंबीय चिंचोली शिवारात एका शेतात वास्तव्यास आहेत. गर्भवती झाल्यापासून आपल्याकडे कोणतीच शासकीय यंत्रणा, अधिकारी कर्मचारी कधीच आलेले नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या महिलेच्या पोटात दोन दिवसांपूर्वी दुखत होते. मात्र, बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास त्रास अधिकच वाढला. यामुळे महिलेला नातेवाइकांनी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी या ठिकाणी सलाइन लावली. मात्र, प्रकृती अधिक खालावल्याने महिलेला रात्री अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. या ठिकाणी रात्री दहा वाजता या महिलेचा मृत्यू झाला. बाळाचाही पोटात मृत्यू झाल्याने पोषणाअभावी हे दोन बळी गेले आहेत.
पतीला वयही सांगता येईना
आदिवासी भागात जनजागृतीचा प्रचंड अभाव असून या ठिकाणच्या उपाययोजना या केवळ कागदावरच दिसत आहेत. अंगणवाड्यांमध्ये धान्य येते. मात्र, ते वाटले जात नाही, असाही आरोप आता यातून होत आहे. मीना बारेला या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आता आणखी गंभीर बाबी यात समोर आल्या आहेत. मीनाच्या पतीला मीनाचे किंवा स्वत:चे वयही सांगता येत नव्हते. मात्र, कोणीही आम्हाला काहीच दिले नाही, गोळ्या औषधी घेतल्या नाही, कुणीही घरी आले नाही, अशी माहिती अन्य नातेवाइकांनी दिली.
डॉक्टर काय म्हणतात?
महिलेचे वजन अत्यंत कमी होते. शरीरात हिमाेग्लोबीनची कमतरता होती. पोषण नसल्याने, रक्त कमी असल्याने ही परिस्थिती महिलेवर ओढावल्याचे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
जीएमसीत शवविच्छेदन
मीना बारेला या महिलेच्या मृत्यूनंतर सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात या महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले.