आम्ही येतो आमच्या गावा...; मात्र तुम्हाला गावबंदी
अजय पाटील
महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपवर नाराज होऊन भाजपचे २७ नगरसेवक सेनेला जाऊन मिळाले. नगरसेवकांची नाराजी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांविषयी होती. ज्येष्ठ नेत्यांचा ‘इगो हर्ट’ करून भाजपमधून सेनेत गेलेले नगरसेवक सहा महिन्यांच्या आतच कंटाळले आहेत. कंटाळले म्हणजे ठरविलेली खुशी न मिळाल्याने आता काही नगरसेवक पुन्हा स्वगृही परतण्यासाठी इच्छुक झाले आहेत. मात्र, ज्येष्ठ नेत्यांचा इगो हर्ट केल्याने या नगरसेवकांना अपात्र करण्यावर ज्येष्ठ ठाम आहेत. ज्येष्ठ नेत्यांना एक दाखवूनच द्यायचे आहे, ‘कुछ भी करनेका, लेकीन भाऊ के इगो को हर्ट नही करनेका’ , नगरसेवक आता दारावर येऊन आम्हाला आमच्या गावात येण्यास परवानगी देण्याची मागणी करत आहेत. मात्र, ज्येष्ठ नेते दारावरच त्यांना थांबवून तुम्हाला गावबंदी असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे नगरसेवकांची स्थिती ‘ना इकडचे ना तिकडचे...’ अशी झाली आहे. ‘खुशी पण नाही मिळाली अन् अपात्रतेची टांगती तलवारही कायम आहे. त्यामुळे जे होते ते बरेच होते भाऊ, असेच म्हणण्याची वेळ नगरसेवकांवर आली आहे.