नगरदेवळा, ता.पाचोरा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अग्नावती प्रकल्पातून पाणी चोरी होत असून ती थांबविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून विद्युतपंप साहित्यासह जप्तीची कार्यवाही करण्यात आली. त्यात पाणी उपसा करणारे ४ विद्युत पंप, केबल व पाईप, पेटी इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले.याच प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. सद्य स्थितीत ७ ते ८ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून प्रकल्पातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यात पाणीचोरी सुरू झाल्याने पाणी प्रश्न गंभीर होणार असल्याचे चित्र आहे. हा प्रकार असाच सुरू असला तर भविष्यात गावाला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल त्यामुळेच आज ही कार्यवाही करण्यात आल्याचे ग्रामपंचायत प्रशासना कडून सांगण्यात आले.बुधवारी ४ विद्युत पंप, पेटी, केबल व पाईप जमा करण्यात आले. त्या कुणाच्या आहेत याबाबत माहिती समोर आली नाही. सदरची कारवाही ग्रामविकास अधिकारी आर.एन. पाटील, माजी सरपंच सुधाकर महाजन व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केली.निव्वळ देखावा ठरू नये प्रकल्पात शिल्लक असलेला पाणीसाठा टिकवण्यासाठी पाणीउपसा करणाऱ्यांवर जप्तीची कार्यवाही ग्रा.पं. प्रशासनाने केली खरी पण संबधीतांची नावे उघड करावी तसेच जप्त केलेले संपूर्ण साहित्य पुन्हा परत करू नये, अशी नागरिकांची मागणी आहे.
अग्नावती प्रकल्पातून पाणीचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:52 IST