मनपाचे दुर्लक्ष : लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासन, मात्र उपाययोजना नाही
जळगाव : शहरातील प्रजापत नगरला लागून असलेल्या सिखवाल नगरात गेल्या अनेक वर्षांपासून मनपातर्फे परिसरात पिण्याच्या पाईप लाईनही न टाकण्यात आल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. पाण्याच्या टंचाईबाबत अनेकदा लोकप्रतिनिधीनी आश्वासने दिली. मात्र, गेल्या दहा वर्षांत एकाही लोकप्रतिनिधींने आश्वासन पूर्ण केले नसल्याची खंत सिखवाल नगरातील रहिवाशांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर या परिसरात नागरी वस्ती वाढली. मात्र, येथील रस्ते, गटारी आणि पिण्याच्या पाण्याची समस्या आजही जैसे थे आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने येथील पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकच बिकट झाली आहे. मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे येथील नागरिकांना बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे व वापरण्यासाठीही तेच पाणी वापरावे लागत आहे. मात्र, उन्हाळ्यात या भागातील बहुतांश नागरिकांच्या बोअरवेलचे पाणी कमी झाल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.
इन्फो :
दहा वर्षांत लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासनचं
या भागातील रहिवाशांनी सांगितले की, निवडणुकीच्या वेळी मते मागण्यासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधी यांना पाण्याच्या समस्यांबाबत सांगितल्यावर त्यांनी निवडून आल्यानंतर तत्काळ पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, दहा वर्षांत निवडणुका झाल्यानंतर निवडून येणाऱ्यांनी अद्याप पाण्याचा प्रश्न सोडविला नाही. विशेष म्हणजे निवडणुकी नंतर हे लोकप्रतिनिधी वाॅर्डात कधी फिरकलेही नसल्याचेही या रहिवाशांनी सांगितले.
इन्फो :
गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. उन्हाळ्यातही या बोअरवेल आटत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे खूपच हाल होत आहेत.
-उमाकांत उपाध्ये, रहिवासी
गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात पिण्याच्या पाण्यासह रस्ते व गटारींचीही समस्या सुटलेली नाही. मनपाचे व लोकप्रतिनिधी यांचे येथील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. येथील सर्व समस्या माहीत असतांनाही लोकप्रतिनिधी यांनी दखल घेतली नाही.
-छगन धनगर, रहिवासी
पिण्याच्या पाण्याची मनपाने पाइप लाईन न टाकल्यामुळे बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. उन्हाळ्यात तेही पाणी कमी होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होतात. मनपा व लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
-कल्पना सूर्यवंशी, रहिवासी
सिखवाल नगरमध्ये तीन कोटींच्या निधीतून रस्ते व गटारींचे कामे केली जाणार असून, निविदा प्रक्रियानंतर या कामाला सुरुवात होईल. तसेच अमृत योजने अंतर्गत लवकरच पिण्याच्या पाण्याचीही समस्या सुटेल.
-किशोर बाविस्कर, नगरसेवक
मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यामुळे खूप हाल होत आहेत. त्यामुळे बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने पाण्याची समस्या सोडावी, ही आमची मागणी आहे.
-रेखा राजपूत, रहिवासी