जळगाव : महावितरण कंपनीच्या जळगाव परिमंडल कार्यालयांतर्गत धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे एकूण १ हजार ९२४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आता महावितरण कंपनीने कंबर कसली आहे. प्रत्येक तालुक्यातील 'टॉप १00' थकबाकीदारांचा शोध घेऊन त्यांचे वीज कनेक्शन तातडीने बंद करावे, असे आदेश महावितरण कंपनीने उपकेंद्रात काम करणार्या अधिकार्यांना दिले आहेत. नियमित वीज बिले जमा करा, असे आवाहन अनेकदा करूनही आपले कोण काय करणार? अशा 'तोर्यात' राहणार्या वीज ग्राहकांची संख्या खान्देशात कमी नाही. वारंवार वीज ग्राहकांना आवाहन करूनदेखील त्याकडे वीज ग्राहक दुर्लक्ष करतात. त्यामुळे महावितरण कंपनीने हा निर्णय घेतला आहे. ४७ उपकेंद्रांतील अधिकार्यांना सूचना वीज बिलांची वसुली करण्यासाठी महावितरण कंपनीने धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील ४७ उपकेंद्रांतील अधिकार्यांना परिमंडल कार्यालयातून प्रत्येक जिल्ह्यातील तालुकानिहाय 'टॉप १00' थकबाकीदार वीज ग्राहकांकडून वीज बिलांची वसुली करावी. त्यांच्याकडून बिले जमा होत नसल्यास वीज कनेक्शन बंद करावे, अशा सूचना कंपनीने दिल्या आहेत.
कृषी संजीवनी योजनेने दिलासा खान्देशातील ग्रामीण भागातील नागरिकांनी कृषी संजीवनी योजनेंतर्गत बिले जमा केल्याने ९५ कोटी रुपयांचा महसूल महावितरण कंपनीला तीन महिन्यात मिळाला आहे. मात्र, घरगुती, औद्योगिक व वाणिज्य क्षेत्रातील ग्राहकांकडून वीज बिलांची वसुली होत नसल्यामुळे वीज कनेक्शन काढून घेण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे.
२२६ फीडरवर भारनियमन सुरू वीज बिलांची वसुली झाली तर भारनियमन मुक्त करण्यात येईल, असे सांगण्यात आल्यानंतर खान्देशातील ३७२ फीडरपैकी १४६ फीडरवरील वीज ग्राहकांची वीज बिलांची वसुली झाल्यामुळे या फीडरवरील भारनियमन बंद करण्यात आले आहे. उर्वरित २२६ फीडरवरील ग्राहकांकडे वीज बिलांची रक्कम मोठय़ा प्रमाणात थकल्यामुळे या फीडरवरील भारनियमन अद्यापही सुरू आहे.
वीजचोरी रोखण्याचे आवाहन विजेची गळती व मोठय़ा प्रमाणात होणारी वीजचोरी रोखण्याचे आवाहन महावितरण कंपनीसमोर आहे. मात्र, थकबाकीदार वीज ग्राहकांकडून वीज बिलांची वसुलीकडे महावितरण कंपनीचे लक्ष असल्यामुळे विजेची चोरी होताना दिसत आहे.
१२00 कनेक्शन बंद महावितरण कंपनीच्या आदेशाला केराची टोपली दाखविणार्या खान्देशातील १२00 थकबाकीदार वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने दिवाळीच्या काळात बंद केले आहेत. २0 टक्के लॉसेस्चे प्रमाण जळगाव परिमंडलअंतर्गत २0 टक्के विजेचे लॉसेस् आहेत. हे प्रमाण कमी करण्याआधी महावितरण कंपनीला वीजचोरीचे प्रमाण थांबवावे लागणार आहे. मात्र, महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीज बिल वसुलीकडे प्रामुख्याने लक्ष देत असल्यामुळे वीजचोरी व विजेच्या गळतीचे प्रमाण खान्देशात 'जैसे थे' आहे. वीजचोरीचे वाढते प्रमाण, वीज ग्राहकांकडे असणारी वीज बिलांची थकबाकी यामुळे खान्देशात भारनियमन सुरू आहे.