माॅन्सून लांबणार :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून, गेल्या दोन वर्षाप्रमाणेच या वर्षीदेखील माॅन्सून लांबण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच जिल्ह्यात आगामी दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. विशेष करून मंगळवारी जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. जून-जुलैच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात दुप्पटचा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात एकूण वार्षिक सरासरीच्या तुलनेत सद्यस्थितीत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असून, सप्टेंबर अखेरपर्यंत ही सरासरी ११० टक्क्यांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. बंगालचा उपसागरावर गेल्या अनेक दिवसांपासून चक्रीय क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन अनेक दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यात ही जोरदार पाऊस बरसत आहे. २०१९ व २०२० प्रमाणेच यावर्षी देखील परतीचा पाऊस ऑक्टोबरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.
जळगाव तालुक्याला सुमारे अर्धा तास जोरदार पावसाने झोडपले
गेल्या पंधरा दिवसांपासून जळगाव शहर व परिसरात दररोज पावसाची हजेरी लागत असून, सोमवारी देखील जळगाव तालुक्यातील आव्हाने, खेडी, वडनगरी, ममुराबाद, फुपनगरी, असोदा या परिसरासह जळगाव शहरातदेखील सुमारे अर्धा तास जोरदार पावसाने हजेरी लावली. अर्धा तासाच्या पावसातच शेतांमधून पाणी वाहत असून, अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पूर्वहंगामी कापसाला मोठा फटका बसला आहे. तसेच सोयाबीन पिकाचा देखील या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
वाघूर नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
वाघूर धरणाची जलपातळी सोमवारी दुपारी ३ वाजता २३३.७९ मीटर झाली आहे. वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी सातत्याने वाढत आहे. येत्या २४ तासांत वाघूर धरणातील जलसाठा पूर्ण होण्याची शक्यता असल्याने धरणातून वाघूर नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्याची कार्यवाही होऊ शकते. त्यामुळे वाघूर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असा इशारा कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिला आहे. नदीपात्रामध्ये गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असेही पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.