लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोणीही मतदानापासून वंचित राहू नये व एकाच व्यक्तीचे नावे दोन-दोन ठिकाणी येऊन मतदार संख्या जास्त दिसणे व मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ नये म्हणून निवडणूक विभागाच्यावतीने मोहीम राबविली जात आहे. यामध्ये आता स्वीप (सिस्टीमेटीक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टीसीपेशन) उपक्रमांतर्गत मतदान नोंदणी जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये महाविद्यालय सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी तसेच विवाह नोंदणी कार्यालय, मंगल कार्यालय या ठिकाणीदेखील मतदार नोंदणीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
दोन ठिकाणी असलेली मतदारांची नावे कमी करणे तसेच मतदानाचे वय होऊनही त्यांची नोंदणी झालेली नसल्यास विशेषत: महिला, दिव्यांग, तृतीय पंथी यांच्या नोंदणीवर भर दिला जाणार आहे. यासाठी बैठकदेखील झाली होती. त्यानुसार आता विविध उपक्रम राबविले जाणार आहे.
मंगल कार्यालयातही नोंदणीची सुविधा
मुलींचे लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव माहेरी व सासरी अशा दोन्ही ठिकाणी मतदार यादीत असते. हे टाळण्यासाठी विवाह नोंदणी, मंगल कार्यालय या ठिकाणीदेखील मतदान नोंदणी अर्ज तसेच नाव कमी करण्याचे अर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच महाविद्यालय सुरू झाल्यानंतर तरुणांच्या नावनोंदणीसाठी तेथेदेखील सुविधा दिली जाणार आहे.
मोबाईलमध्ये उपलब्ध होणार मतदार ओळखपत्र
सध्या सर्वत्र डिजिटलायझेशन होत असल्याने आता मतदार नोंदणीदेखील मोबाईलवर करता येणार आहे. तसेच नाव नोंदणीनंतर आपले मतदार ओळखपत्र मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येणार आहे. जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर असे साडे सहा हजार कार्ड डाऊनलोड करण्यात आले आहे.
२९ हजारावर नावे केली कमी
मतदार यादी अद्यायावत करण्यात येत असून जानेवारी २०२१पासून आतापर्यंत मयत झालेले, स्थलांतरीत झालेले व इतर कारणांनी २९ हजार २७९ नावे मतदार यादीतून कमी करण्यात आली आहेत. तसेच १८ हजार ४४२ मतदारांच्या नावातील छायाचित्र, नाव बदल अशा वेगवेगळ्या चुका दुरुस्त करण्यात आल्या आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात १९ हजार १७० नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली असून एकूण मतदारांची संख्या ३४ लाख २० हजार ३७ वर पोहचली आहे. यामध्ये १७ लाख ८१ हजार ९७० पुरुष मतदार असून १६ लाख ३८ हजार ८८१ स्त्रीया तर ८६ इतर मतदार आहेत. तसेच ८ हजार ५५ सैनिक मतदार आहेत. एक हजार ४९३ नावांचे अंतर्गत बदल करण्यात आले असून जिल्ह्यातील मतदार यादी आता १०० छायाचित्र असणारी आहे.
स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जनजागृती केली जात असून नवीन मतदान नोंदणीसाठी विवाह नोंदणी कार्यालय, मंगल कार्यालय, महाविद्यालय अशा ठिकणी मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
- तुकाराम हुलवळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी.