लोकमत न्यूज नेटवर्क
हरताळा, ता. मुक्ताईनगर : हरताळे गाव पूर्वापार डोंगराजवळ वसलेले आहे. डोंगराच्या पायथ्याशी मोठी वस्ती आहे. त्या वस्तीजवळ असलेला डोंगर पावसाळ्याच्या दिवसात ढासळत असून, डोंगराचे पाणी घरांमध्ये शिरते. डोंगराच्या भागाखाली राहणाऱ्या ग्रामस्थांच्या घरापर्यंत दगड-माती खचून घरावर पडत असल्याने डोंगराचे पाणीही भिंतींमध्ये मुरते. यामुळे रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्याठिकाणी आरसीसी बांधकाम करून मोठी संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनानेही या ठिकाणी भराव टाकून घरांमध्ये शिरणाऱ्या पाण्याला आडोसा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून डोंगराच्या पायथ्याशी वस्ती असलेले हे गाव आहे. या ठिकाणी दगड, माती धसत असते. २५ ते ३० फूट उंच डोंगराच्या पायथ्याशी नागरी वस्ती असल्याने त्या ठिकाणी मोठी दरी आहे. तेथूनच वरच्या बाजूलादेखील वस्ती आहे.
गेल्या ६०-७० वर्षांपूर्वी येथील जाणकारांनी या वस्तीला दगडांमध्ये भिंत बांधून आडोसा करून गैरसोय दूर केली होती. काहींनी त्याची आठवण करून दिली, तर काहींना माळीण गावासारख्या भूस्खलनाची आठवण झाली.
हरताळे येथील वस्तीतील लोक मोठे कसरत करत ये-जा करत असतात. त्यासाठी येथे संरक्षक भिंत किंवा आरसीसी बांधकाम करून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी येथील रहिवासी अशोक श्रीराम तायडे, प्रकाश सीताराम निकम व जवळ राहणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी केली आहे.
रात्री-अपरात्री दरड धसून पडल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी यासंदर्भात येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला अर्ज दिला होता. काही वेळा वरील डोंगराचे पाणी घरातूनसुद्धा झिरपत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरवेळेस भिंती भिजतात. त्यामुळे घरात लहान मुले असल्याने भीती वाटत असल्याचे सांगितले. दुर्घटना घडण्यापूर्वीच येथील मोठा निधी उपलब्ध करून आरसीसी काम करून गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
तसेच वरिष्ठांनी व लोकप्रतिनिधींनीदेखील या प्रश्नात लक्ष घालावे. भविष्यात दुर्घटना होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया
संरक्षक भिंतीसाठी वरिष्ठ स्तरावर मागणी केली आहे. संबंधित कामाविषयी प्रस्ताव पाठवला आहे. येथे आरसीसी काम करणे अपेक्षित आहे. सुमारे १५ लाख रुपयांपर्यंत निधी मिळणे अपेक्षित आहे. पाणी शिरणाऱ्या ठिकाणी लवकरच आडोसा करून भराव टाकण्यात येईल.
-एस.एन. इंगळे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत, हरताळा, ता. मुक्ताईनगर
प्रतिक्रिया
संपूर्ण डोंगराचे पाणी घरात शिरते. घरात लहान मुले आहेत. खूप भीती वाटते. ग्रामपंचायतीकडे सांगितले असता वाॅर्डातील सदस्यांना सांगा. सदस्यांना सांगितले असता तुम्ही आम्हाला मतदान केले नाही. ज्यांना मतदान केले असेल त्यांच्याकडे जावे, असे सांगितले जाते. निवडणुकीच्या वेळी पाया पडत येतात. गरिबाने कोणाकडे धाव घ्यावी? एकमेकांवर टोलवाटोलवी करून वेळ निभावून नेली जात आहे. प्रशासनाने घरात पाणी शिरणार नाही, याची दक्षता घ्यावी, एवढीच अपेक्षा आहे.
-अशोक श्रीराम तायडे, ग्रामस्थ, हरताळा