लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने नॅक पुनर्रमूल्यांकनासाठीची जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकताच इन्स्टिट्यूशनल इन्फॉर्मेशन ऑन क्वालिटी अशोरन्स (आयआयक्यूए) अहवाल विद्यापीठाकडून नॅकला ऑनलाइन सादर करण्यात आला आहे, अशी माहिती नॅक सुकाणू समिती समन्वयक प्रा. विजय माहेश्वरी यांनी दिली.
पुनर्मूल्यांकनासाठी नॅककडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. मात्र, कोरोनाच्या पाश्वभूमीवर विद्यापीठात कर्मचा-यांची उपस्थिती कमी असल्यामुळे नॅक संदर्भातील उर्वरित माहिती गोळा करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, आता विद्यापीठाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यापीठाने इन्स्टिट्यूशनल इन्फॉर्मेशन ऑन क्वालिटी अशोरन्स (आयआयक्यूए) हा अहवाल तयार केला असून तो नुकताच नॅक समितीकडे ऑनलाइन सादर करण्यात आला आहे. अहवालाची पडताळणी झाल्यावर नॅक समितीकडून हिरवा कंदिल मिळताच, स्वयंमूल्याकन अहवालसुद्धा विद्यापीठाकडून ४५ दिवसांच्या आता नॅकला ऑनलाइन पद्धतीने सादर केला जाणार आहे. दरम्यान, स्वयंमूल्याकन अहवालसुद्धा अंतिम टप्प्यात आहे. नॅकसाठी आवश्यक असलेले कागदपत्र तसेच त्यांच्या पंधरा हजार प्रती, प्रोफाईल त्यासोबत छायाचित्रे तयार असल्याची माहिती माहेश्वरी यांनी दिली. दरम्यान, स्वयंमूल्याकन अहवाल सादर झाल्यानंतर काही दिवसात महिन्यांनंतर नॅकच्या चमूकडून विद्यापीठाची पाहणी केली जाईल.