अमळनेर तालुक्यात दोघा शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 03:10 PM2020-08-01T15:10:31+5:302020-08-01T15:17:34+5:30

वाघोदे शिवारातील दुर्घटना, लोंढवे गावात शोककळा

Two school friends drowned in Amalner taluka | अमळनेर तालुक्यात दोघा शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू

अमळनेर तालुक्यात दोघा शाळकरी मित्रांचा बुडून मृत्यू

Next


संजय पाटील
अमळनेर : तालुक्यातील वाघोदे शिवारामध्ये नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या लोंढवे येथील दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थी मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील स्व.एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारे भावेश बळीराम देसले ( वय १५) , हितेश सुनील पवार (वय १५) आणि जयवंत सुरेश पाटील हे तिघे मित्र शनिवारी जवळच असलेल्या नाल्यात पोहण्यासाठी गेले होते. पावसामुळे हा नाला तुडूंब भरून वाहत आहे. भावेश देसले आणि हितेश पवार हे दोन्ही १५ फूट खोल पाण्यात गेले आणि आही वेळातच ते बुडू लागले. दोन्ही मित्र बुडत असल्याचे पाहून जयंवत हा गलितगात्र झाला. थरथरत्या अंगाने आणि कापºया आवाजाने त्याने दोघांना वाचवण्यासाठी आरडाओरड केली. परंतु जवळ कोणीच नसल्याने मदतीला कोणीही आले नाही. यानंतर त्याने गावात धाव घेऊन दोघे मित्र पाण्यात बुडल्याची माहिती दिली. लगेच भावेश, हितेश यांच्या कुटुबीयांसह ग्रामस्थ त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील, सरपंच कैलास खैनरनार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पटापट नाल्यात उड्या टाकून दोघा मुलांचे मृतदेह अवघ्या पंधरा मिनीटात बाहेर काढले. दोघांच्या कुटुंबियांनी आपल्या काळजाच्या तुकड्यांना मृतावस्थेत पाहुन तेथेच हंभरडा फोडला. या घटनेने गाव सुन्न झाला आहे.
पोहताना दोर तुटला आणि घात झाला..
भावेश, हितेश आणि जयवंत या तिघांपैकी भावेश याला चांगले पोहता येत होते. परंतु मित्र हितेश याला पोहता येत नसल्याने त्याला दोर बांधून भावेश पोहण्याचे शिकवत होता. तर जयवंत हा काठावरच होता. त्यालाही दोघांनी पोहण्यासाठी येण्याचा आग्रह केला होता. परंतु त्याला पोहता येत नसल्याने तो नाल्यात उतरलाच नाही. काही वेळाने हितेशचा तोल जाऊ लागला. त्यात त्याला बांधलेला दोरही तुटला. त्यामुळे भावेशने त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तर जयवंत काठावर बसून मदतीचा प्रयत्न करीत होता. परंतु दुर्दैवाने हितेशचा पाय अधिकच खोल पाण्यात गेल्याने त्याला वाचवताना पोहता येत असूनही भावेश पाण्यात बुडला आणि दोन्ही मित्राच करुना अंत झाला.
दोन्ही सामान्य शेतकरी कुटुंबातील मुले
भावेश आणि हितेश या दोन्ही मित्रांचे वडील शेतकरी असून त्यांची घरची परिस्थिती सर्वसामान्य आहे. भावेश हा एकुलता एक मुलगा होता. तसेच त्याला एक बहिण आहे. तर हितेश हे तीन भाऊ असून तो घरात सर्वात मोठा होता. यामुळे या दोन्ही कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान भावेश आणि हितेश यांचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणून शवच्छदेन करण्यात आले. यावेळी लोंढवे येथील ग्रामस्थ, दोन्ही मुलांचे कुटुंबिय, नातलग आणि शाळेचे मुख्याध्यापकांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Two school friends drowned in Amalner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.