जळगाव : जळगावात दवाखान्यात दाखल असलेल्या आजीला भेटून परत घरी जात असताना उमाळा घाटात दोन चारचाकींची समोरासमोर धडक होऊन त्यात नमू रामेश्वर चौधरी (७) व डिगंबर रामराव भोसले (४०) हे जागीच ठार झाले तर रामेश्वर रामदास चौधरी (३२) व अर्चना रामेश्वर चौधरी (३०, सर्व रा.वाकोद, ता.जामनेर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा साई (६) नावाचा मुलगा बालंबाल बचावला आहे. हा अपघात शनिवारी रात्री ९ वाजता झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर चौधरी यांची नातेवाईक महिला जळगावात दवाखान्यात दाखल होती. तिला पाहण्यासाठी ते पत्नी अर्चना, मुलगी मनू, मुलगा साई व मित्र डिगंबर चौधरी असे चारचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.यु.३९१८) आले होते. दवाखान्यात दाखल महिला मृत मुलीची नात्याने आजी लागते. रात्री सर्व कामे आटोपल्यानंतर ९ वाजता ते वाकोद येथे जायला निघाले. उमाळा घाटात वळणावर समोरुन येणारी मालवाहू चारचाकी (क्र.एम.एच.४१ ए.यु.१८०७) जोरदार चौधरी यांच्या गाडीवर आदळली. चालकाच्या बाजुला बसलेले भोसले व त्यांच्या शीटच्या मागील शीटवर बसलेली नमू हे दोघं जागीच गतप्राण झाले. अपघात इतका भीषण होता की चौधरी यांच्या चारचाकीचा चुराडा झाला.
भोसले हे वाहन चालक होते, मात्र आज चौधरी वाहन चालवत होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील , गणेश शिरसाळे, सचिन पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत व जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर रात्री ११.३० वाजता चौधरी दाम्पत्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दैव बलवत्तर म्हणून चौधरी यांचा मुलगा साई हा बालंबाल बचावला.