निलगायींची शिकार करताना धुळे येथील दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 06:01 PM2019-11-11T18:01:47+5:302019-11-11T18:01:54+5:30

जामनेर तालुक्यातील कारवाई : आरोपींचे जामनेर कनेक्शन असण्याची शक्यता?

Two arrested in Dhule while hunting for nilgai | निलगायींची शिकार करताना धुळे येथील दोघांना अटक

निलगायींची शिकार करताना धुळे येथील दोघांना अटक

Next




जामनेर : तालुक्यातील नागणचौकी गावाजवळ असलेल्या जंगलात नीलगायींची शिकार करताना धुळे जिल्ह्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळील जीपमध्ये (क्र.एमएच-०२-जे-९७६०)े नीलगायीचे मांस व दोन रायफल, काही जिवंत काडतुस सापडले असून यातील दोन जण फरार झाले आहेत. ही कारवाई सोमवारी सकाळी साडेपाच वाजता करण्यात आली. मेहमूद महमद अबिद (४५), अन्सारीसोद मोहमद अबिद (३२) दोघे रा. वल्डीपुरा, धुळे यांना पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने पकडले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील नागण चौकी गावालगत जंगल असून जंगलात मोठ्या प्रमाणावर नीलगाय, हरीण आदी प्राणी आहेत.धुळे येथील चार व्यक्ती शिकार करुन या जंगलातून निघत असताना त्यांची जीप जंगला जवळच्या चारीत फसली. या दरम्यान गावातील तीन तरुण सागर नाईक, नामदेव घोर, आकाश कोळी हे फिरायला निघाले होते. रस्त्यावर अडकलेली जीप काढण्यासाठी गावातील या तरुणांनी गाडी बाहेर काढण्यास मदत केली. त्या तरुणांनी त्यांना विचारपूस केली असता आम्ही बाहेरगावचे आहे व आमचा एक जोडीदार गावात गाडी काढण्यासाठी ट्रक्टर आण्यासाठी गेला आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी तरुणांना त्यांच्यावर संशय आला असता त्यांनी त्यांची गाडी पुन्हा फसवून टाकली व चौकशी केली असता त्यांच्याजवळ दोन रायफल व गाडीत नीलगायींचे मांस असल्याचे दिसले. गावातील सागर नाईक यांनी त्यांच्याकडून एक रायफल हिसकावली व फायर करताच त्यांनी भरधाव वेगात गाडी काढली व ते नागण चौकी गावाकडे निघाले. मात्र काही ग्रामस्थांना पाहून ते पुन्हा जामनेरकडे वळले. गाडी भरधाव असतानाच एका तरुणाने चालकाला दगड मारल्याने ती पलटी झाली.
दरम्यान, ग्रामस्थांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्याने पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलिस उपनिरीक्षक विकास पाटिल, सचिन पाटील, राहुल पाटील, अमोल घुगे, जयसिंग राठोड यांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले व दोन आरोपी हर्षद (चालक रा.धुळे), उस्मान शाह (रा. नाचनखेडा, ता.जामनेर) हे पळून गेले. पोलिसांनी आरोपीकडून एक जिप्सी गाडी, दोन रायफल, दोन नीलगायींचे मांस, २६ (२.२) चे जीवंत कारतुसे, १३(३०६) काडतूस असा एकूण तीन लाख ४५ हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त केला आहे. घटनास्थळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील, वनपाल काळे, वनरक्षक टी.एन. घरजाळे, वैशाली कुलकर्णी, चरणदास चव्हाण, कल्याणसिंग पाटील यांनी पंचनामा केला. तर पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. पी.एल.राणे, पशुधन वैद्यकीय अधिकार डॉ.एस. एस.व्यव्हारे यांनी मांसाचे नमूने घेतले.
गावातील तरुणांचे मोठे सहकार्य
झालेला प्रकार सोडून देण्याची विनवणी करीत आरोपींनी गावातील तरुणांनी पैशाचे आमिष दाखविले. मात्र पैसे न घेता एका तरुणाने रायफल हिसकावून घेत फयरिंग केली. मोठ्या हिमतीने मुकाबला करुन पकडण्यात योगदान दिले.
अटक केलेल्या आरोपीवर १० वर्षांपूर्वी याच प्रकारचा गुन्हा जामनेर पोलिसात दाखल आहे. हे शिकारी नीलगाय, काळवीटांच्च्या शिकारीसाठी आले होते. पोलिस कॉन्स्टेबल राहुल पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.
यामधे आणखी काहींचा समावेश असण्याची व अटक झालेल्या आरोपींचे जामनेर कनेक्शन असण्याची शक्यता असून पोलिस सखोल चौकशी करीत आहेत. कटर मशीनने हे मास कापल्याचे निदर्शनास आले असून ते जंगलात फेकून दिल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: Two arrested in Dhule while hunting for nilgai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.