श्याम गोविंदा
भुसावळ : रेल्वेच्या विद्युत इंजिन कारखान्याकडे (ईएलडब्लू) १३ टॉवर वॅगन तयार करण्याचे काम रेल्वे बोर्डाने सोपवले आहे. यातील एक टाॅवर वॅगन तयार झाली असल्याची माहिती तेथील सिनियर सेक्शन इंजिनियर राकेश काळे यांनी दिली.
विद्युत इंजिन कारखान्याने आतापर्यंत चांगल्या प्रतीचे इंजिन बनवल्याने ही नवीन जबाबदारीही या विभागावर सोपविण्यात आली आहे.
काय आहे टॉवर वॅगन
ही टॉवर वॅगन ओएचई दुरुस्ती करण्यासाठी वापरतात. टॉवर वॅगन डिझेलवर चालणार आहे. यात कारप्रमाणेच सस्पेन्शन तयार करण्यात आले आहे. यात दोन इंजिन बसवण्यात आली आहेत. एक इंजिन फेल झाल्यावर दुसऱ्या इंजिनवर काम चालवता येईल. याआधीच्या टॉवर वॅगन डिझेल हायड्रोलिक आहेत. यात नवीन डिझेल इलेक्ट्रीक कार आहे, यात ट्रॅक्शन मोटार बसविण्यात आली आहे. त्यामुळे ही ताशी ११० किलोमीटर स्पीडने चालवता येणार आहे.
रात्री कुठेही अपघात झाल्यास वॅगनद्वारे रेल्वेचे पन्नास - साठ कर्मचारी घेऊन ताबडतोब पोहोचतील. अंधार असल्यास फ्लड लाईट, हाय पाॅवर लाईटची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. साधारण एक टाॅवर वॅगन बनवायला दोन कोटी रुपये एवढा खर्च येतो. विशेष म्हणजे यात टॉयलेट, बाथरुम, किचन, सीसीटीव्ही, वर्कशॉप व आराम करण्यासाठी एक केबीनही असेल. टाॅवर वॅगन ७३.३९ फूट लांब, तर १०.६४ फूट रुंद व १२.७६ फूट उंच आहे.
यासाठी मुख्य कारखाना प्रबंधक शिवराम, उपमुख्य प्रबंधक सारिका गर्ग, वरिष्ठ विद्युत अभियंता निखिल सिंग, सहाय्यक विद्युत अभियंता पी. के. सिंग, वरिष्ठ अनुभाग अभियंता राजेश काळे, भूषण चौधरी, संदीप कुमार, एन. एन. निंबोळकर यांच्यासह इतर रेल्वे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
कोट.
आम्ही सन २०१२ ते २०१५ पर्यंत २३ नवीन अत्याधुनिक इंजिन बनवल्याने रेल्वे बोर्डाने १३ टॉवर वॅगन बनवण्याची जबाबदारी दिली आहे. रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिल कुमार लाहोटी यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे.
- शिवराम, मुख्य कारखाना प्रबंधक, विद्युत इंजिन कारखाना, भुसावळ.
फोटो ओळी: भुसावळच्या विद्युत इंजिन कारखान्यात तयार होत असलेली टॉवर वॅगन.