लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : एकीकडे शासनाच्या पीक पेरा लावण्याची पद्धत किचकट झाल्याने शासनाने पीक पेरा लावण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविली असून, दुसरीकडे शासनाने २०२१-२२ च्या खरीप हंगामातील भरड धान्य खरेदीसाठी नोंदणीची मुदतदेखील ३० सप्टेंबर दिली आहे. १६ पासून जिल्ह्यातील १४ केंद्रांवर नोंदणी सुरू होत आहे. या संदर्भातील निर्णयही तातडीने तालुक्यांना पाठविण्यात आल्याने गडबड उडाली आहे.
दरवर्षी शासन नोव्हेंबरमध्ये खरीप हंगामाची भरड धान्य खरेदी नोंदणी सुरू करीत असते. यंदा मात्र शासनाने एनईएमएल पोर्टलवर नोंदणी ३ सप्टेंबरपासून सुरू केली; परंतु जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी सर्व खरेदी केंद्रांना १४ रोजी पत्र पाठविले आहे. ज्वारीसाठी हमीभाव २७३८ रुपये, बाजरीसाठी २२५० रुपये, मका १८७० रुपये जाहीर झाला आहे.
जिल्ह्यात १४ खरेदी केंद्रे
जळगाव जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, जळगाव, रावेर, मुक्ताईनगर, तालुका खरेदी विक्री संघ, एरंडोल, जामनेर, पाचोरा, भडगाव, पारोळा, चाळीसगाव शेतकी संघ, बोदवड परचेस अँड सेल युनियन, जळगाव औद्योगिक सेवा संस्था, अण्णासाहेब फ्रुटसेल सोसायटी पाळधी या केंद्रावर खरेदी होणार आहे.
अशी शक्कल लढविली जाऊ शकते?
गेल्या वर्षीच्या रब्बी पिकाची नोंदणी झाली होती मात्र खरेदी झाली नाही. शेतकऱ्यांचा माल शिल्लक आहे. यावर्षी जर शेतकऱ्यांनी त्याच पिकाची लावणी केली असेल तर शेतकरी आपला जुना शिल्लक माल नव्या नोंदणीवर विकू शकतो.
पत्राची किमया!
जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी १४ रोजी केंद्रांना पत्र पाठवून ३ सप्टेंबरपासून नोंदणी करण्याचे सूचित केले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत मुदत आहे आणि यंदा ऑनलाईन पीक पेरा लावण्याची मुदतदेखील आता ३० सप्टेंबरपर्यंत ठेवण्यात आली आहे. शेतकऱ्यांची नोंदणी ३० पर्यंत होईल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे शासनाने अडीच-तीन महिन्यांपूर्वीच नोंदणी करण्याचे कारण काय यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
---
अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँक खाते सुरू असल्याची खात्री करून आधार कार्ड व पीक पेऱ्याचा सातबारा उतारा घेऊन शेतकी संघात नोंदणी करावी
- संजय पाटील, व्यवस्थापक, शेतकी संघ अमळनेर