लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : म्यूकरमायकोसिसचे तीन नवे संशयित रुग्ण समोर आले असून आता सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ८ संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहे. यातील ४ रुग्णांना स्वतंत्र ७ नंबरच्या कक्षात दाखल करण्यात आले आहे. काही रुग्ण हे व्हेंटीलेटरवर असल्याने त्यांना कोविडच्याच कक्षात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जीएमसीच्या टास्कफोर्सची शनिवारी बैठक घेण्यात आली. बुधवारी या आजाराबाबत सर्वांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
म्यूकरमायकोसिसच्या उपचारांचे नियोजन, रुग्णांचे निदान यासाठी जीएमसीत टास्कफोर्स नियुक्त करण्यात आला आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता आता आरोग्य यंत्रणेने याकडे लक्ष केंद्रीत केल्याचे चित्र आहे. त्यात या टास्कफाेर्सची अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास बैठक घेतली. दरम्यान, हा आजार नेमका काय आहे. याची लक्षणे काय, यावर उपचार काय, रुग्णांना कसे उपचार द्यावेत, निदान कसे करावे, याचे सर्व प्रशिक्षण हे रुग्णालयातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ डॉक्टरांना बुधवारी देण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सांगितले.
औषधींचा तुटवडा मग उपचार कसे
म्यूकरमायकोसिसवर उपचारासाठी लागणारे एम्फोटेरिसीन बी हे इंजेक्शन अद्याप शासकीय रुग्णालयाला प्राप्त झालेले नाहीत. यासह आवश्यक त्या गोळ्याही अद्याप आलेल्या नाहीत. त्यामुळे उपचार नेमके सुरू कसे करावे, असा प्रश्न डॉक्टरांसमोर आहे. यासह जिल्ह्यात खासगी यंत्रणेतही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस अधिक होत असताना औषधीच उपलब्ध नसल्याने आता या औषधांसाठी रुग्णांची फिरफिर वाढल्याचे चित्र आहे. एका रुग्णाला जिल्हाभरात ही औषधी कुठेच उपलब्ध झालेली नव्हती, त्यामुळे हा मुद्दा आता ऐरणीवर आला असून प्रशासनाने औषधींबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.
आज बैठक
म्यूकरमायकोसिसच्या वाढत्या प्रार्दूभावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली जाणार आहे. मंगळवारी सायंकाळी ४ वाजता ही बैठक होणार असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी.जमादार यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.