सुनील पाटील
जळगाव : वाहनधारकांनो, तुमच्या वाहनावर हजारोंचा दंड तर नाही ना? याची खात्री करा. कारण आता तुम्ही नियमांचे उल्लंघन केले असेल तर वाहतूक पोलीस तुमच्या मागे फिरत बसणार नाही. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर वाहतूक पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. तुम्ही नो पार्किंगमध्ये वाहन उभे करून कुठे निघून गेलात किंवा रस्त्यावर नियमांचे उल्लंघन केले व पोलिसांनी तुम्हाला थांबायला सांगितले तर तुम्ही न थांबता सुसाट निघून गेला तरी तुमच्यावर कारवाई होणार आहे. यासाठी आता ई-चालान प्रणालीचा वापर केला जात आहे.
सन २०१९ ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत ८ कोटी ७ लाख ६० हजार ८०० रुपये इतका दंड वाहनधारकांना आकारण्यात आलेला आहे. त्यापैकी १ कोटी २५ लाख ९४ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल झालेला आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या साडेसात महिन्यांत नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना ४ कोटी ५८ लाख ४४ हजार १०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, तर ७८ लाख ८१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उर्वरित वाहनधारकांनी दंडच भरलेला नाही. हा दंड कधी ना कधी भरावाच लागणार आहे, त्यातून सुटका नाहीच. दंड थकीत असलेले वाहन वाहतूक पोलिसांच्या हाती लागले तर कदाचित ते जप्तही होऊ शकते. दुसऱ्याच्या हाती वाहन दिले तर त्याच्या दंडाचा भुर्दंड हा मालकालाच बसणार आहे.
कसे फाडले जाते ई-चालान
१) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनाचा फोटो वाहतूक पोलिसांकडून मोबाइलमध्ये घेतला जातो. त्यानंतर हा फोटो ई-चालान सिस्टमसाठी तयार करण्यात आलेल्या ग्रुपवर पाठविला जातो. तेथे संबंधित कर्मचाऱ्याकडून त्याची पडताळणी केली जाते. खरोखर नियमांचे उल्लंघन झाल्याची खात्री पटल्यानंतर वाहन क्रमांक सिस्टममध्ये अपलोड केला जातो.
२) त्यानंतर संबंधित वाहन मालकाचे नाव, पत्ता याची संपूर्ण माहिती मिळते. वाहनावर नेमकी कोणती कारवाई केली, त्याचा दंड किती याचा तपशील व फोटो चालानवर टाकला जातो. त्यानंतर ५ रुपयांचे तिकीट लावून दुसऱ्या दिवशी हे चालान वाहन मालकाला पोस्टाने पाठविले जाते. वाहन खरेदी करताना मोबाइल क्रमांक दिला असेल तर त्यावर लगेच संदेशही प्राप्त होतो.