चंद्रमणी इंगळे ।हरताळा : एकेका ग्रामपंचायतीच्या प्रशासकाकडे एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा पदभार आहे. यामुळे प्रत्येक गावाला दररोज प्रशासक येत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी प्रशासक नियुक्तीबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ असल्याचे दिसले.मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा, कोथळी, सालबर्डी, माळेगाव, मानेगाव या गावांतील ग्रामपंचायतींना सोमवारी सकाळी साडेआठ ते दहाच्या दरम्यान भेट दिली. त्यातील चार ठिकाणी कार्यालयांमध्ये प्रशासक नियुक्त केले गेले असल्याचे सांगण्यात आले. माळेगाव येथे सकाळी अकराला प्रशासक आले.हरताळा येथे आरोग्य पर्यवेक्षक अर्जुन केशव काळे यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी गेल्या सोमवारी पदभार स्वीकारला. सध्या ते गावातील घरपट्टी, नळपट्टी, पाणीपट्टी आदी बाबींवर लक्ष देत आहे. त्यांच्याकडे दोन गावांचा पदभार असून हरताळा, वडोदा ही दोन गावे असून, प्रत्येक गावाला येथे एक दिवस असा वेळ देऊन ते कार्यभार सांभाळत आहे. त्यानंतर उरलेल्या पाच दिवसात ते पर्यवेक्षक असल्याने तालुक्याच्या ठिकाणी त्यांना तिथे वेळ पाच दिवस वेळ द्यावा लागतो.कोथळी येथे शाखा अभियंता के. एन.राणे यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे तालुक्यातील कोथळी, हिवरा, पारंबी, शेमळदे या चार गावांचा पदभार आहे. ते कोथळी येथे रुजू झाले. गावात कोरोना संबंधित जनजागृतीचे काम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.कनिष्ठ अभियंता दीपक सुधाकर भंगाळे यांची सालबर्डी, घोडसगाव, निमखेडी खुर्द येथे प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. येथेसुद्धा तीन गावांचा पदभार असल्यामुळे दिवस वाटून घेतले असल्याचे सांगण्यात आले.माळेगाव व मानेगाव या ग्रामपंचायतींना भेट दिली असता माळेगाव येथील प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले प्रफुल विश्वासराव भामरे यांनी २१ रोजी माळेगाव येथील पदभार स्वीकारला, तर मानेगाव येथे मंगळवारी पदभार स्वीकारला असून त्यांच्याकडेसुद्धा मानेगाव, माळेगाव, मेंढोळदे या तीन गावांचा पदभार आहे.यासंदर्भात प्रत्येक गावात भेट देऊन विचारपूस केली असता ग्रामस्थांनी एका व्यक्तीकडे एकच गाव द्यावे म्हणजे प्रशासकाला गावासाठी पुरेपूर वेळ देता येईल व समस्या मार्गी लागू शकतील, असे सांगण्यात आले. त्यातच जवळपास ९० टक्के ग्रामस्थांना प्रशासक नियुक्तीसंदर्भात अद्यापही माहिती नसल्याचे सांगण्यात आले, तर काही ठिकाणी प्रशासक रुजू होऊन काम करत असल्याचे सांगण्यात आले.ग्रामस्थ म्हणतात...हरताळा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले आहे. ते आठवड्यातून दोन दिवस हजेरी देतात. एकाच गावाचा पदभार अपेक्षित आहे. लोकांचीही दाखल्यांची कामे होत आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी असल्याने ते गावातील आरोग्यविषयक समस्या व कोरोनासंदर्भात जनजागृती करत आहे. जनतेनेसुद्धा आरोग्यासंदर्भात सहकार्य करावे.-राजेंद्र प्रेमचंद जैन, ग्रामस्थ, हरताळा, ता.मुक्ताईनगर.कोथळी ग्रामपंचायतीत प्रशासक रुजू झाले. नुकताच ग्रामसेवक रोकडे, उपसरपंच उमेश राणे व पोलीस पाटील संजय चौधरी आदींच्या उपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारलो. चार गावांचा पदभार कमी करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम त्यांनी आरोग्य विषयाला प्राधान्य दिले असून, गावात यासंदर्भात उपाययोजना व माहिती देणे सुरू केले आहे.-संजय चौधरी, ग्रामस्थ, कोथळी, ता.मुक्ताईनगर
एकापेक्षा जास्त गावे असल्याने ग्रामपंचायतींवरील प्रशासक दररोज येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 19:56 IST
एकेका ग्रामपंचायतीच्या प्रशासकाकडे एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा पदभार आहे.
एकापेक्षा जास्त गावे असल्याने ग्रामपंचायतींवरील प्रशासक दररोज येईना
ठळक मुद्देलोकमत रियालिटी चेकअनेक ठिकाणी प्रशासक नियुक्तीबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ