भुसावळ : शहर व तालुक्यात आरोग्य संकट वाढले आहे. एकीकडे कोरोना रुग्ण आटोक्यात आले आहे, मात्र दुसरीकडे मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजाराने डोके वर काढले आहे. तालुक्यातील कंडारी येथे डेंग्यूसह मलेरियाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाने केला आहे.
तातडीने दोषींवर कारवाई करावी, गावासाठी तातडीने कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नियुक्ती करावी, नागसेन कॉलनीतील अंगणवाडीला घाणीच्या विळख्यातून बाहेर काढावे आदी मागण्यांबाबत गटविकास अधिकारी विलास भाटकर यांना निवेदन देण्यात आले. मागण्यांची दखल न घेतल्यास आरपीआय आठवले गटातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर उपाध्यक्ष विश्वास सोमाजी खरात, पप्पू सुरडकर, शरद सोनवणे, तालुकाध्यक्ष दिलीप मोरे, भगवान निरभवणे, सुनील ढिवरे, सुनील रायमळे, महेंद्र भोसले, गौतम तायडे, प्रशांत घुसळे, विजय मोरे, सिद्धार्थ मोरे आदींची नावे आहेत.