चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
वरखेडी ता. पाचोरा : लोहारा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा प्रोसेडिंगमध्ये बनावट ठराव आणि नमुना ८- असाठी पैसे घेऊन बनवाट उतारे दिल्याच्या कारणावरून सरपंच, उपसरपंच व दोन कर्मचारी अशा चार जणांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्कालीन सरपंच मालती संजय पाटील, उपसरपंच कैलास संतोष चौधरी, ग्रामविकास अधिकारी आर. टी. बैसाणे व संगणक चालक प्रल्हाद नामदेव चौधरी अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
दि. २६ जानेवारी २०१९ रोजी लोहारा येथे ग्रामसभा झाली. या ग्रामसभेच्या प्रोसेडिंग बुकात बनावट व बेकायदेशीर ठराव लिहिण्यात आले. प्रोसिडिंग बुकात फेरफार व खाडाखोड करून त्याच्या आधारावर नमुना नं. ८-अचे मालकीहक्क दाखविणारे बनावट उतारे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वाटण्यात आले. याबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार करण्यात आली होती.
याअनुषंगाने पाचोरा येथील बीडीओंनी तत्कालीन सरपंचांना पत्र पाठवून बनावट झालेले सर्व नमुना नं. ८ चे उतारे रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नोंदवहीतील ४३२ उतारे रद्द करण्यात आले. फौजदारी कारवाई अशा सूचना देण्यात आल्या.
सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव (हरे.) पोलीस ठाण्याचे स.पो.नि.कृष्णा भोये व त्यांचे सहकारी करीत आहेत. याबाबत तत्कालीन सरपंच मालती पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.