कजगाव, ता. भडगाव : नगरदेवळा दूरक्षेत्रचे पोलीस रात्र गस्तीवर असताना त्याच्या सतर्कतेमुळे कजगाव येथील दीड लाखाच्या पशुधनाची चोरी टळली तर दुसऱ्या घटनेत घर मालक यांच्या समयसूचकतेमुळे चोरी टळली. मात्र, या प्रकाराने ग्रामस्थ तसेच पशुधन मालक यांच्यात घबराट पसरली आहे. कजगाव येथील शेतकरी हिरालाल रूपसिंग पवार यांची कजगाव नागद मार्गावर शेती आहे. याठिकाणी त्याचे सर्व गुरंढोरं बांधलेली असतात. दि. २० रोजी रात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान नगरदेवळा दूरक्षेत्राची गाडी रात्र गस्तीवर फिरत असताना या गाडीचा सायरन वाजल्याने हिरालाल पवार यांच्या शेतातील अज्ञात चोरटे पळू लागल्याने पोलिसांना शंका आली.
गस्तीवर असलेले पोलीस पो. हे. कॉ. नरेंद्र शिंदे, विनोद पाटील, पो. कॉ. मनोहर पाटील, पोलीस शंकर पाटील, वाहन चालक मज्जीद पठाण यांनी गाडीतून खाली उतरत शोधाशोध केली. मात्र, पशुधन चोरटे अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.
चोरट्यांनी तीन बैल, एक गाय असे दीड लाखाचे बांधलेले पशुधन खुंट्यावरून सोडले होते. सुदैवाने नगरदेवळा येथील वस्तीवर आलेल्या पोलीस गाडीमुळे ही चोरी होता होता वाचली. पोलिसांनी भोरटेकचे पोलीस पाटील यांना घटना कळविल्यानंतर आठ ते दहा युवक शेतावर पोहोचले नि पोलीस व युवकांनी चोरट्यांची शोधाशोध केली. मात्र, याचा काही उपयोग झाला नाही. पशुधन मालक हिरालाल पवार यांना कळविल्यानंतर त्यांनी चोरीस जाणारे पशुधन शेडमध्ये बांधले.
त्याच रात्री कजगाव येथील मराठी शाळेसमोर जीन भागातील रहिवासी भाजप कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष विनोद धर्मराज हिरे यांच्याकडे मध्यरात्रीनंतर चोरटे चोरी करण्यासाठी तयार असतानाच घरातील महिलेस जाग आल्याने संडासच्या पडदीवर कोणी तरी बसला असल्याचे लक्षात आले. तिने घरातील सदस्यांना जागे केले. आरडाओरडा केल्याने नागरिक जागे झाले नि चोर पोलीस असा खेळ सुरू झाला. बराच पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले.
रात्री कजगावच्या पोलीस मदत केंद्रावर सारे ग्रामस्थ पोहोचल्यावर पो. कॉ. विजय पाटील यांनीदेखील परिसरात चोरट्यास शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे पसार झाले होते. लागोपाठ दोन घटनांमुळे पशुधन मालक व ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.