पाडळसे, ता. यावल : पाडळसे येथील २ आणि बामणोद येथील ३ दुकाने फोडून चोरांनी सलामी दिली आहे. यात एक घर, एक मंदिर, दोन हॉटेल, एका किराणा दुकानाचा समावेश आहे. या चोऱ्या बुधवारी मध्यरात्रीनंतर झाल्या.
पाडळसे येथील डेली मार्केटमध्ये विशाल राजेंद्र भिरूड हे रात्रपाळीस असताना त्यांचे बंद घर फोडून घरातील पितळेची ३ मोठी भांडी, साड्या, साधारण १० हजारांची रोख रक्कम असा माल लंपास केला. तर त्याच्याच शेजारी असलेल्या दुर्गा माता मंदिराची दान पेटीचे चोरट्यांनी कुलूप तोडून रक्कम घेऊन पोबारा केला. पोलीस घटनास्थळी दाखल असता श्वान पथक बोलाविण्यात आले. पथकाने बसस्टँडजवळील हौदापर्यंत माग दाखविला व तेथेच घुटमळले. यानंतर जळगाव येथील ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात येणार होते.
याचबरोबर बामणोद येथील बसस्टँडलगतचे कल्पना रेस्टॉरंटमधून पाचशे रुपये रोख तसेच दुकानातील देवाजवळील डब्यातील रक्कम, ४ बिड्यादेखील चोरांनी लंपास केल्या. शेजारील श्रीराम रेस्टॉरंटच्या गल्ल्यातील २ हजारांची रक्कम लंपास करण्यात आली असल्याचे मालक वसंत ढाके यांनी सांगितले. हे दोन्ही हॉटेल फैजपूर- बामणोद डांबरी रस्त्याला लागूनच असल्याने चोरांनी पोलिसांचा धाक न बाळगता बिनधास्तपणे चोरी केली. त्याच प्रमाणे बामणोद चौकातील जोगेश्वरी किराणातील एक तेलाचा डबा, १ तांदळाचा कट्टा, चारशे रुपये रोख, १२ सिगारेट पॉकीट चोरले, तसेच ४ आइस्क्रीम कोन चोरांनी खाल्ल्याचे गिरीश पाटील यांनी सांगितले.
अशा प्रकारे बामणोद ओट पोस्ट हद्दीतील एकूण ५ ठिकाणी चोऱ्या केल्या. यामुळे पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
चार चोर असण्याची शक्यता
कल्पना रेस्टोरंटध्ये ४ बिड्या, जोगेश्वरी किराणा दुकानातील ४ आइस्क्रीम कोन चोरांनी फस्त केल्याने यातील चोर हे बिडीची तलपी म्हणजेच बिडी पिणारे तर नव्हते ना? अशी शंका आहे. तर चार व आइस्क्रीम कोनदेखील फस्त केले. त्यामुळे चोर चौघे असण्याची शक्यता आहे.
या घटेबाबत फैजपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर व एसआय हेमंत सांगळे घटनास्थळी थांबून माहिती घेत आहे. त्यांच्या समवेत सरपंच खेमचंद कोळी, पोलीस पाटील सुरेश खैरनार हेदेखील सहकार्य करत आहेत. याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनशी प्रतिनिधीने संपर्क साधला असता उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे फैजपूर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार महेश वंजारी यांनी सांगितले.
पाडळसे येथील विशाल भिरूड यांच्या घरातील कॉटमधील अस्ताव्यस्त केलेले सामान. (प्रभाकर तायडे, पाडळसे)