बापू पितांबर भोसले (३५, लोंढे, ता. चाळीसगाव) यांनी लोंढे शिवारातील शेडमध्ये त्यांच्या मालकीची गुरेढोरे बांधली होती. २७ रोजी सायंकाळी ७ वाजता गुरांना चारापाणी करून झोपण्यासाठी घरी निघून गेले. सकाळी ६ वाजता भोसले हे शेतात आले असता शेडमध्ये बांधलेल्या ३ गायी व १ गोऱ्हा दिसून आला नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध केली असता शेजारील सतीश प्रकाश भोसले (लोंढे, ता. चाळीसगाव) यांच्याही मूळ मालकीच्या दोन गायी अज्ञाताने चोरून नेल्याचे दिसून आले.
१ लाख ४८ हजार रुपये किमतीच्या पाच गायी व एक गोऱ्हा अज्ञात इसमाने चोरून नेल्याने भोसले कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहे. त्यांनी शोधाशोध केल्यानंतरही गायी मिळून न आल्याने बापू पितांबर भोसले यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिसात भादंवि कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे.कॉ. दीपक नरवाडे हे करीत आहेत.