जळगाव : ज्या हातांनी पित्याला पहिली कमाई द्यायचे ठरवले होते, नियतीने त्याच हातांनी अग्निडाग देण्याची दुर्दैवी वेळ एका लेकीवर आणली. काबाड कष्ट करून मुलीला उच्च शिक्षण देत नोकरीला लावले, परंतु अवघ्या काही दिवसांतच हा आनंदाचा झरा आटला. मुलगी नोकरीला रवाना होताच इकडे वडील अपघातात गंभीर जखमी होऊन कोमात गेल्याचा निरोप तिला मिळाला. अखेर २१ दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
मंगळवारी दोन्ही लेकींनी 'दमलेल्या बाबाला' मुखाग्नी देत अश्रू डोळ्यांतच जिरवत आईला आधार दिला. ही दुर्दैवी वेळ शहरातील मुक्ताईनगर येथील बोरसे कुटुंबावर ओढावली आहे.
२१ दिवसांपासून मृत्यूशी झुंजमुक्ताईनगर येथील रहिवासी असलेले ललित भास्कर बोरसे (४६) हे प्लम्बिंग काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. ललित यांना दोन मुली. मोठी मुलगी नयन 'बीटेक'चे शिक्षण पूर्ण करून पुणे येथील भारत फोर्ज कंपनीत नोकरी लागली होती, तर दुसरी मुलगी भूमी ही सहावीत शिकत आहे. ललित यांची पत्नी रुपाली या देखील पतीला संसारात हातभार लागावा, म्हणून शिवणकाम करीत संसाराचा गाडा ओढत होत्या. मोठ्या मुलीला नोकरी लागल्याने ती काही दिवसांपूर्वीच पुण्याला खाना झाली होती, परंतु नियतीच्या मनात काही वेगळच होते. काही दिवसांपूर्वी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर प्लम्बिंग काम करीत असतानाच ललित यांचा अपघात झाला. खाली पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने गेल्या २१ दिवसांपासून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते.
मोठी मुलगी बनली कुटुंबाचा आधारवडिलांच्या अपघाताची माहिती मिळताच मोठी मुलगी नयन ही पुण्याहून घरी परतली. आता मंगळवारी वडिलांचे निधन झाल्याने तिलाच घराचा आधार बनण्याची वेळ आली आहे. वडिलांच्या कार्याचा सोपस्कार उरकल्यानंतर ती पुन्हा जड अंतःकरणाने नोकरीला रुजू होणार आहे. मुलींनी दिला अग्निडागललित यांना रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, परंतु त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांना सोमवारी व्हेंटिलेटरसह घरी पाठवण्यात आले होते, परंतु दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा ललित यांना शहरातील वैकुंठधाम स्मशानभूमीत मुलींकडून अग्निडाग देण्यात आला.
भजनी मंडळात सहभागललित बोरसे हे अतिशय धार्मिक स्वभावाचे होते. जवळच निवृत्तीनगर परिसरात असलेल्या हनुमान व महादेव मंदिरात त्यांच्याकडून अनेक वेळा कीर्तन, भंडारा आदी धार्मिक कामांमध्ये त्यांच्याकडून नेहमी श्रमदान केले जात असे.