या घटनेमुळे कांचन नगर परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांचा कडेकाेट बंदोबस्त लावण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, शनिपेठचे निरीक्षक बळीराम हिरे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. शस्त्रांबाबत तज्ज्ञ असलेले आरमर शाखेचे कर्मचारीही दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरील पिस्तूल व काडतूसची तपासणी केली. पोलिसांनी गल्लीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन जण पळताना दिसत होते. बाबू सपकाळे हा देखील त्यात कैद झाला आहे. जखमी आकाश याने सोनू अशोक सपकाळे व बाबू सपकाळे यांची नावे सांगितल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर जखमी विक्की याच्यावर पोलीस बंदोबस्तात उपचार केले जात आहे.
दोन पिस्तूलचा वापर
घटनास्थळावर एकच पिस्तूल मिळून आला असला तरी त्यात दोन पिस्तूलचा वापर झाल्याचा संशय पोलिसांना आहे. काही जिवंत काडतूस व पुंगळ्या अशांची संख्या आठ आहे. त्यामुळे दोन पिस्तूलचा वापर झाल्याचा संशय आहे. त्याशिवाय जखमी विक्की याचा मोबाइल ही रक्ताने माखलेला होता. आकाशच्या घरात सोफ्यावरदेखील पुंगळी व काडतूस आढळून आले. पोलिसांनी या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.
भावाचा खून केल्यामुळेच रचला कट
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बाबू सपकाळे याची पोलीस अधीक्षकांनी चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देतानाच माझ्या भावाचा खून केला होता, म्हणून मी देखील आकाशच्या खुनाचा कट रचला. विक्की हा खून झालेला भाऊ राकेश याचा मित्र होता, म्हणून तो सोबत आला असे देखील बाबू याने पोलिसांना सांगितले. बाबू याचा भाऊ सोनू सपकाळे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावर सोनू नव्हता, मात्र कट रचण्यात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.