रावेर तालुक्यातील प्रकार : चौकशी समितीने निविदा रद्द करण्याची केली शिफारस
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रावेर तालुक्यात दलित वस्ती योजनेंतर्गत निविदा प्रक्रियांमध्ये अनियमितता असल्याबाबत माजी उपाध्यक्ष विद्यमान सदस्य नंदकिशोर महाजन यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार चौकशी होऊन ३५ पैकी ३४ गावांमधील ७२ कामांच्या ई-निविदा या चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आल्याचे समोर आले असून, या निविदा रद्द करण्याबाबत समितीने आपल्या अहवाला शिफारस केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
गोरखेडा, ता. रावेर या गावात दलित वस्ती योजनेंतर्गत कामांमध्ये अनियमितता, तसेच नियम डावलून कामे होत असल्याबाबत सदस्य नंदकिशोर महाजन यांनी जुलै महिन्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी के.बी. रणदिवे यांच्याकडे तक्रार दिली होती. या अनुषंगाने तालुक्यातील सर्वच गावांतील कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत सर्वसाधारण सभेतही वादळी चर्चा होऊन अखेर या कामांच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली होती. यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी के.बी. रणदिवे, ग्रामपंचायत विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे, समाज कल्याण विभागाचे अधिकारी विजय रायसिंग यांचा समावेश होता. समितीने तालुक्यात जाऊन चौकशी केली. यात निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत माहिती घेतली. त्यानुसार समितीने अहवाल तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे सुपुर्द केला असून, त्यांनी तो स्वीकारला आहे. त्यानुसार आता पुढील कारवाईसाठी हा अहवाल ग्रामपंचायत विभाग तसेच समाजकल्याण विभागाकडे सुपुर्द करण्यात आल्याचे के.बी. रणदिवे यांनी सांगितले.
ग्रामसेवकांकडून खुलासे मागविणार
प्राथमिक स्तरावर या प्रकरणात ग्रामसेवकांकडून याबाबत खुलासे मागविले जाऊ शकतात. त्यानंतर ग्रामसेवक व सरपंचांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ३४ गावांमधील या निविदा चुकीच्या पद्धतीने राबविल्या गेल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
कोट
मी गोरखेडा गावातील कामांच्या अनियमिततेबाबत तक्रार दिल्यानंतर पूर्ण तालुक्याच्या कामांची चौकशी केली. त्यात ही निविदा प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने यापुढे निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवावी, अशी अपेक्षा आहे.
-नंदकिशोर महाजन, जिप सदस्य