जळगाव - शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत असून, मनपाने अखेर मोकाट कुत्र्यांचा निर्बीजीकरणासाठी निविदा काढली आहे. १७ मार्चपर्यंत या निविदा मागविण्यात आल्या आहेत. याआधीही मनपाकडून निर्बीजीकरणासाठी निविदा काढण्यात आली होती. अमरावती येथील एका कंपनीला हा मक्ता देण्यात आला होता. मात्र, प्राणिमित्रांच्या तक्रारीनंतर हे काम थांबविण्यात आले होते. दरम्यान, हा प्रश्न खूप गंभीर झाला असून, मनपाने त्वरित मक्ता देऊन हे काम सुरू करण्याची मागणी होत आहे.
गटारीची घाण टाकली घरासमोर
जळगाव - शहरातील खेडी परिसरातील पत्रकार कॉलनीच्या मागील बाजूस अमरसिंह बोरसे यांच्या घरासमोरील गटारीची घाण मनपा आरोग्य विभागाकडून काढण्यात आली. मात्र, ही घाण जमा न करता सफाई कर्मचाऱ्यांनी बोरसे यांच्या घरासमोरच ही फेकून दिली आहे. यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याआधी देखील सफाई कर्मचाऱ्यांनी बोरसे यांच्या घरासमोर घाण फेकली आहे. याबाबत आरोग्य विभागाने कारवाई करण्याची मागणी बोरसे यांनी केली आहे.
किमान तापमानात पाच अंशाची घट
जळगाव - गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत आहे. एकीकडे कमाल तापमान ४० अंशाकडे वाढत असताना, किमान तापमानात मात्र पुन्हा घट सुरू झाली आहे. बुधवारी शहराचा पारा १२ अंशापर्यंत खाली आला होता. मंगळवारी किमान पारा १७ अंश इतका होता. एकाच दिवसात तापमानात ५ अंशाची घट झाली आहे. त्यामुळे दिवसा कडक ऊन तर रात्री थंडी अशा दुहेरी वातावरणाचा अनुभव जळगावकर घेत आहेत.
अनधिकृत हॉकर्सवर कारवाई
जळगाव - शहरातील अनधिकृत हॉकर्सकडून नियमांचे पालन केले जात नसल्याने मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाईची मोहीम सुरूच आहे. बुधवारी देखील मनपाच्या पथकाकडून सुभाष चौक, बळीराम पेठ, गणेश कॉलनी चौक भागात जोरदार कारवाई करण्यात आली. १८ हॉकर्सचा माल जप्त करण्यात आला आहे.