पारोळा : समोरून येणाऱ्या बसला वाचविण्याच्या प्रयत्नात बसचालकानेच कट मारल्याने रसायन घेऊन जाणारा टँकर उलटला. यात लाखो रुपये किमतीचे रसायन मातीत मिसळले. टँकर उलटला असला तरी चालकाच्या समयसूचकतेमुळे बसमधील २५ ते ३० प्रवाशांचे प्राण वाचले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आशिया महामार्गावरील मुंदाणे फाट्याजवळ घडली. यात हा टँकरचालक जखमी झाला.
हाजीपूर येथून नागपूरकडे जात होता. या टँकरमध्ये जी-२ रसायन होते, अशी माहिती जखमी टँकरचालकाने दिली. क्रेनच्या साहाय्याने टँकर उभा करण्यात आला.
दोऱ्यासह कापड तयार करण्यासाठी जी-२ हे सुमारे ३१ टन रसायन घेऊन टँकर (क्र.एनएल १२ आरएल २९१३) चालक शिवशंकर हा हाजीपूर येथून नागपूरकडे जात होता. मुंदाणे फाट्याजवळ पारोळ्याकडून धुळ्याकडे जाणाऱ्या बसचालकाने टँकरला कट मारला. कट मारण्यापूर्वी चालकाने टँकर रस्त्याच्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यातच कट लागल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. सुदैवाने टँकर बसला ठोकला गेला नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. टँकरचालकामुळे बसमधील किमान २५ ते ३० प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
रसायनाचा टँकर उलटल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रसायनगळती झाली. महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चौपदरीकरणाच्या कामाचा वेग वाढला पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टँकर क्रेनच्या साहाय्याने उभा केला. चालक शिवशंकर याच्या फिर्यादीवरून अज्ञात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.