जळगाव : बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात उद्योजक सुनील झंवर याला मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले आहे. मुळ फिर्याद रद्द करण्यासाठी झंवर याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्यावर कामकाज करताना मंगळवारी न्यायालयाने एक आठवड्यात झंवर याने पुण्याच्या विशेष सत्र न्यायालयात जावून अटकपूर्व जामीनासाठी जावे व त्यापुढील आठवड्यात न्यायालयाने निकाल द्यावा असा निर्णय दिला आहे.
दरम्यान, दुसरीकडे झंवर व जितेंद्र कंडारे मिळून येत नसल्याने पुण्याच्या विशेष न्यायालयाने दोघांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. शरण येण्यासाठी १० मार्च अंतिम तारीख दिली आहे. त्यांच्या घरासह, पोलीस ठाणे, न्यायालय आवार आदी ठिकाणी नोटीसाही डकविण्यात आलेल्या आहेत. त्यात मंगळवारी उच्च न्यायालयाने झंवरला दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले आहे. याबाबत सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनीही दुजोरा दिला आहे.
पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यासह पिंपरी चिंचवड व ग्रामीणमधील एक अशा तीन ठिकाण ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याबाबत बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, विवेक ठाकरे, सीए.महावीर जैन, धरम सांखला, सुजीत वाणी यांच्यासह इतरांविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत. सुनील झंवरचा मुलगा सूरज यालाही अटक झालेली आहे. त्यानेही उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावरील सुनावणीही पुढे ढकलण्यात आली आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल झाल्यामुळे महावीर जैन यानेही उच्च न्यायालयातून जामीन अर्ज मागे घेतला आहे.