जळगाव : सुरतवरून प्रयागराजकडे निघालेल्या ताप्तीगंगा गाडीवर जळगाव स्टेशन जवळील शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या पुढे अज्ञात तरुणाने या गाडीच्या दिशेला दगड भिरकावला. या घटनेत गाडीचा एसी कोचची काच फुटली असून या प्रकरणी जळगाव स्टेशनवरील रेल्वे पोलिस दल स्टेशनमध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव स्थानकावरून प्रयागराजकडे जाणाऱ्या ताप्तीगंगा एक्स्प्रेस क्रमांक १९०४५ गाडीवर रविवार दुपारी सव्वातीन वाजता शिवाजीनगर उड्डाणपूल सोडल्यानंतर अंदाजे २० ते २५ वर्षीय तरुणाने दगड मारला. या घटनेत ताप्तीगंगा एक्स्प्रेस बी-६ च्या डाव्या बाजूच्या खिडकीची काच फुटली. यात सुदैवाने मात्र कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही.
या घटनेची माहिती भुसावळ स्थानक प्रमुखांना मिळाल्यानंतर त्यांनी फुटलेली काच तत्काळ बदलली. गाडीवर दगडफेक झाल्याने बी-६ कोचमधील प्रवासी चांगलेच भयभीत झाले. यात मुलांसह महिला, पुरुषांचा समावेश होता. याबाबत प्रवाशांनी समाज माध्यमांवर घटनेचा व्हिडीओ शेअर करून रेल्वे अधिकारी व पोलिसांना माहिती दिली.