एरंडोल : शहरात नवीन पाईपलाईनसाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या वर्षा राजेंद्र शिंदे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिले आहे.
न.पा.च्या वाढीव हद्दीतील क्षेत्राचा विस्तार मोठा आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये पाईपलाईन कुठे चार इंची, तर कुठे तीन इंची, तर कुठे दोन इंची आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही.
एरंडोल शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नागरिकांना होणारा पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात व सुरळीत व्हावा यासाठी नवीन जास्त व्यासाच्या पाईपलाईनच्या विकासकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
एरंडोल शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जुनी असल्यामुळे पाणी वितरण योग्य प्रमाणात होत नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.