चाळीसगाव, जि. जळगाव : मुसळधार पावसामुळे कन्नड घाटात जागोजागी दरडी कोसळल्या आहेत. रस्ता मोकळा करण्याचे काम बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. या कामासाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. कन्नड घाटातील वाहतूक नांदगावमार्गे वळविण्यात आली आहे.
मंगळवारी पहाटे कन्नड घाटात जागोजागी दरडी कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे सुमारे सत्तर ते ऐंशी लहान-मोठी वाहने कन्नड घाटात अडकून पडलेली होती. तसेच भूस्खलन झाल्याने एक वाहन दरीत कोसळून त्यातील चालक मयत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
कन्नड घाटात नाशिक विभागीय महामार्ग विभागाचे डीवायएसपी शांताराम वळवी, धुळे विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत भामरे, महामार्ग पोलीस केंद्र चाळीसगाव येथील उपनिरीक्षक भागवत पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार तसेच सर्व कर्मचारी मेहनत घेत आहेत.
याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी महेश पाटील व कर्मचारी, राज्य आपत्ती व्यवस्थापन दल व स्थानिक पोलीस अधिकारी-कर्मचारी असे स्थानिक यंत्रणेमार्फत मदतकार्य सुरू आहे. आतापावेतो घाटात अडकलेल्या सुमारे ५० ते ५५ वाहनांना मोकळे करण्यात आले आहे.