लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या स्तरावर शासनाकडून निधी प्राप्त होत असतो. मात्र, ग्रामपंचायतमध्ये हा निधी दिव्यांगांच्या कल्याणावर खर्च होताना दिसून येत नाही. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. दिव्यांगांच्या कल्याणासाठी ग्रामपंचायत स्तरावर आलेला निधी हा त्यांच्या कल्याणावर खर्च होणे गरजेचे असून, असे काम न करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवारी जिल्ह्यातील ६२ दिव्यांग बांधवांना शहरातील लेवा भवन येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण, महानगरप्रमुख शरद तायडे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, पंचायत समिती सभापती ललिता पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जि.प. सदस्य पवन सोनवणे, पंचायत समिती उपसभापती संगीता चिंचोरे आदी उपस्थित होते. यावेळी ६२ दिव्यांग बांधवांना यावेळी तीन चाकी सायकल, चेअर, एलबो स्टीक, व्हिल चेअर, कर्णयंत्र, अंधकाठी, वॉकिंग स्टीक, वॉकर आदी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
दिव्यांग बांधवांना ३५ किलो धान्य द्या
गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले की, गेल्या महिन्याभरात ७६ दिव्यांगांना पगार सुरू केले आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाला ३५ किलो धान्य देण्याचा सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. तसेच येत्या महिनाभरात ग्रामपंचायत निधीतून गावातील दिव्यांग बांधवांवर निधी खर्च करा अन्यथा कारवाई ग्रामसेवक वर करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. यासह शासनाकडे समाजकल्याण विभागासाठी निधीचीदेखील मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली.