तपकीर आणि लॉटरीचं तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 04:19 PM2017-08-28T16:19:13+5:302017-08-28T16:19:40+5:30

लोकमतच्या ‘वीकेण्ड’ पुरवणीमधील अॅड. माधव भोकरीकर यांचा लेख शनिवार, दि. 26 ऑगस्ट 2017

Snuff and lottery tickets | तपकीर आणि लॉटरीचं तिकीट

तपकीर आणि लॉटरीचं तिकीट

Next

माङो वडील आपल्या आयुष्यात केव्हा तरी ‘लॉटरी’ लागेल या आशेने नियमीत महाराष्ट्र राज्य लॉटरीची तिकिटे घ्यायचे. नोकरीला होते तेव्हा हे प्रमाण जास्त होते कारण गावात येणंजाणं असायचे. मात्र नोकरीतून दोन वर्षाची मुदतवाढ मिळाल्यानंतर निवृत्त झाल्यावर तुलनेने गावात जाणे कमी झाले म्हणून तिकिटे काढणे आपोआपच कमी झाले. ‘तिकिटांमधे जेवढे पैसे गेले तेवढेपण पैसे काही आजर्पयत लॉटरीतून मिळाले नसतील.’ आमच्या आईचे नेहमीचे उद्गार! यावर ‘असू दे ! मिळतील केव्हा तरी!’ हा वडिलांचा तिला दिलासा. आईचा यावर विश्वास नसे. तिकिटे मात्र ते स्वत:च काढत, कोणाला काढण्यासाठी पाठवत नसत. थोडय़ा गप्पा झाल्यावर माझी आठवण यायची. ‘अरे, तपकीर आणायला सांग रे.’ म्हणत त्या कनवटीला खोचलेल्या कापडी पिशवीतून पाच-दहा पैसे काढायच्या. काही वेळा सोबत पिशवी असायची तर काही वेळा नसायची. ‘काकू, तुम्ही जा घरी. मला पण तपकीर आणायची आहे. तुमची पण आणायला सांगतो.’ भाऊ काकूंना सांगायचे. ‘बरं, पाठव त्याला घरीच. मी निघते आता’ म्हणत त्या उठायच्या. चालायला लागायच्या. जाताजाता माङया धाकटय़ा काकूंशी बोलायच्या. मी भाऊंकडून पैसे घेऊन दुकानात जायचो. वडिलांना ‘मद्रास तपकीर’ लागायची. भाऊंकडून पैसे घेऊन थोडे जवळचे दुकान म्हणजे शारंगधरशेठ कासार यांचे. एकदा त्यांच्याकडून तपकीर घेतली व दलाल काकूंना नेवून दिली. त्यांनी पुडी उघडून पाहिली, त्यांना हवी असलेली तपकीर नव्हती. ‘अरे, ही माझी तपकीर नाही. परत कर आणि माझी आण.’ त्यांनी तपकिरीचे नाव सांगितले. पुन्हा दुकानावर जाणे आले. त्यांच्याकडून तपकीर बदलवून घेणे आले. अपमानास्पद प्रसंग, करणार काय? कारण घरातील काम सोडून इतरांच्या कामाला नकार देण्याइतका बाणेदारपणा त्यावेळी आमच्यात नव्हता. ते कोणाचेही काम पूर्ण व्यवस्थितपणे करावे लागे. अलिकडची पिढी तुलनेने भाग्यवान! काम न करून सांगणार कोणाला? परत गेलो, शारंगधरशेठ बसले होते. त्यांना तपकिरीची पुडी परत दिली व सांगितले, ‘ही नको. बदलवून दुसरी द्या.’ त्यांनी तपकिरीचे नाव विचारले, मी आठवू लागलो. मला सांगता येईना. त्यांनी माझी अडचण ओळखली व विचारले, ‘कोणाला पाहिजे आहे?’ मी समस्या सुटल्याच्या आनंदात सांगितले, ‘दलाल काकू!’ ‘मग, हे अगोदर नाही सांगायचे की दलाल काकूंची तपकीर म्हणून?’ शारंगधरशेठ बोलले. मला ऐकून घेणे भाग होते. त्यावेळी कोणासाठीही कोणाचेही बोलणे ऐकावे लागायचे. एकंदरीत तडफ कमीच होती. आता नाही ऐकणार कोणी! त्यांनी काळसर तपकिरीची पुडी बांधली व सांगितले, ‘त्यांची तपकीर दिली आहे. यापुढे त्यांना हवी असेल तर त्यांचे नाव सांगत जा.’ ही त्यांनी समज दिल्यावर, मी ती पुडी घेतली व काकूंना आणून दिली. त्यांना प्रसंग जसा घडला तसा सांगितला. त्या हसल्या. त्यांनी पुडी उघडून पाहिली व समाधानाने मान हलवून छान! म्हणत चिमूटभर ओढली. ते छान कोणाला होते हे अजूनही समजले नाही; बहुतेक शारंगधरशेठ यांच्या धोरणीपणाला असावी. कदाचित माङयावर आईच्या कडक स्वभावाचा परिणाम जास्त असावा. मी लॉटरीचे तिकीट आजर्पयत फक्त दोनदा काढले, ती निदान 25 वर्षापूर्वी! एकदा म्हणजे तिकिटे विकणारा फारच पोरसवदा मुलगा होता, त्याच्या ‘साहेब, एक तरी तिकीट घ्या.’ या विनंतीतील स्वर मला हलवून गेला म्हणून! आणि दुस:यांदा भुसावळला कोर्टातूून येताना, घाईगर्दीत तिकीट विक्रेत्याने अगदी अजीजीने म्हटले म्हणून! दोन्ही वेळा मला बक्षीस मिळाले, पण नंतर मी तिकीट काढले नाही. ‘परमेश्वराला जर आपल्याला काही द्यायचे असेल तर तो आपल्या कष्टांचे फळ देईल, बसल्या-बसल्या तिकीट काढून घरी पैसे देणार नाही’ ही माझी भावना ! आता काही वेळा समजते या वयात, भाऊ लॉटरीची तिकिटे का घेत असतील? त्यासाठी जवळचे पैसे का खर्च करत असतील? आता त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत मी आहे. मग त्यांच्यापुढील त्या वेळच्या अनेक अडचणींचा डोंगर डोळ्यापुढे येतो. त्यांची ओढाताण, मनाची घालमेल, परिस्थितीचा रेटा, त्याला तोंड देण्याची असलेली ताकद ! आणि मग माझाच मी असं काहीतरी लिहून जातो. (उत्तरार्ध)

Web Title: Snuff and lottery tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.