विनोद कोळी
पाळधी, ता. जामनेर : साप दिसला की भल्याभल्यांची भंबेरी उडते, तर काहींची बोबडी वळते. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, असे म्हटले जाते. त्यापासून पर्यावरणाचा समतोल साधला जातो. याबाबत मोठी जनजागृती होत असली तरी सापापासून चार हात लांब राहणेच बहुतेक जण पसंत करतात. सापाला मारू नये, असे कितीही सांगितले जात असले तरी भीतीपोटी माणूस सापाला जिवंत सोडत नाही, हे अनेकदा प्रत्ययास येते. परंतु आता समाजात अनेक सर्पमित्र सापांना वाचविण्यासाठी पुढे सरसावलेले दिसतात. त्यातीलच पाळधी येथील तरुण हे कार्य नि:स्वार्थीपणे करीत असून त्यांनी आतापर्यंत पाळधीसह परिसरातून तब्बल पंधराशेच्यावर विषारी, बिनविषारी साप पकडून त्यांना जंगलात सुखरूपपणे सोडून देण्याचे पर्यावरणपूरक कार्य केले आहे.
पाळधी येथील सर्पमित्र नाना माळी व देवा माळी हे कार्य करीत आहेत. २०१४ पासून साप पकडण्याची कला अवगत केली व त्यातून आवड निर्माण झाली. मुंबई पोलीस तसेच सर्पमित्र मुरलीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला धामण, गांडुळ, कवड्या, तस्कर असे बिनविषारी साप पकडण्यास सुरुवात केली तर आतापर्यंत सात वर्षांत या दोन्ही तरुणांनी गावात व परिसरात जवळपास १५०० सर्पांना लिलया पकडून गावापासून पाच कि. मी. अंतरावर असलेल्या जंगलात सोडून त्यांना जीवदान दिले आहे. यामध्ये कोब्रा, अजगर, नाग, मण्यार, फुरसे, घोणस, मांजऱ्या यांसारख्या विषारी सापांना पकडून सुरक्षित स्थळी जंगलात सोडले आहे. परिसरात साप आढळल्यास त्यांना मारू नका तर आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र नाना माळी यांनी केले आहे. त्याच्या या कामगिरीचे पाळधी परिसरातून कौतुक केले जात आहे.
पाळधी किंवा परिसरात कोठेही मानवी वसाहतीत साप निघाल्यास मला माहिती देतात. आपणही कुणाकडून कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता या सापास पकडून वन अधिवासात सोडून देतो, जेणेकरून पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण होईल.
-नाना माळी, सर्पमित्र, पाळधी
120821\12jal_2_12082021_12.jpg
सर्पमित्रांमुळे पाळधी परिसरात सापांना मिळते जीवदान