‘ऑपरेशन शिवधनुष्य’साठी सहा जणांनी आखली व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:16 AM2021-03-16T04:16:18+5:302021-03-16T04:16:18+5:30

स्थानिक व राज्य पातळीवरून हलली सूत्रे : तीन महिन्यांपूर्वीच सुरू झाले होते मिशन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या ...

Six people devised a strategy for 'Operation Shivadhanushya' | ‘ऑपरेशन शिवधनुष्य’साठी सहा जणांनी आखली व्यूहरचना

‘ऑपरेशन शिवधनुष्य’साठी सहा जणांनी आखली व्यूहरचना

googlenewsNext

स्थानिक व राज्य पातळीवरून हलली सूत्रे : तीन महिन्यांपूर्वीच सुरू झाले होते मिशन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीला अवघे तीन दिवस शिल्लक असताना ‘ऑपरेशन शिवधनुष्य’ आखत शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक आपल्या बाजूने करत भाजपला महापौरपदापासून दूर ठेवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. तीन महिन्यांपासून या ऑपरेशनला सुरुवात झाली होती. या ऑपरेशनदरम्यान शिवसेनेच्या सहा जणांकडून व्यूहरचना आखली आहे. आतापर्यंत या व्यूहरचनेप्रमाणे जळगाव मनपावर शिवसेनेचा भगवा फडकेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. सहा जणांपैकी तीन जणांनी राज्य तर तीन जणांनी स्थानिक पातळीवरून सूत्रे हलविली असून, ‘ऑपरेशन शिवधनुष्य’ आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

राज्य पातळीवरचे सूत्रधार

१. खासदार विनायक राऊत

शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार असून, जळगाव महापालिकेतील ऑपरेशन शिवधनुष्यबाबत सर्वात आधी शहरातील शिवसेनेच्या नेत्यांनी यांच्याशीच संपर्क केला. यांच्या साहाय्यानेच पुढील कार्यवाही झाली. मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्याच संपर्कात होते. तसेच विनायक राऊत यांच्याद्वारेच ही माहिती शिवसेना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

२. एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचाही मोठा सहभाग या ऑपरेशनमध्ये आहे. महापौरपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत जर भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेला मदत केल्यास अपात्रतेच्या कारवाईबाबत काय? याबाबत भाजपच्या काही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्याशीच चर्चा केली. यासह महापालिकेत भाजपच्या बंडखोर नगरसेवकांच्या बळावर शिवसेनेची सत्ता आल्यास मनपाला राज्य शासनाकडून चांगला विकास निधी देण्याची हमीदेखील एकनाथ शिंदे यांनीच घेतली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. यासह गायब असलेले नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याच देखरेखीखाली आहेत, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

३. गुलाबराव पाटील, पालकमंत्री

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाही मुख्य सहभाग ऑपरेशन शिवधनुष्यमध्ये असून, रविवारी भाजपचे बंडखोर नगरसेवक मुंबईला रवाना होण्याआधी गुलाबराव पाटील यांच्याच फार्महाऊसवर सुमारे ३ तास थांबून होते. सुनील महाजन, कुलभूषण पाटील यांच्याकडूनही गुलाबराव पाटील याबाबतची संपूर्ण माहिती घेत होते. तसेच याबाबतची सूत्रे व बैठका जळगावला न घेता मुंबई व पाळधीहूनच घेण्यात आल्याची चर्चा आहे.

स्थानिक पातळीवर यांनी हलविली सूत्रे

१. सुनील महाजन, मनपा विरोधी पक्षनेते

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर मनपा बरखास्तीसह इतर नगरसेवकांना जवळ घेण्यासाठी सुनील महाजन यांनीच पुढाकार घेतला. तसेच अनेक नगरसेवकांशी संपर्कात राहून गुप्त पद्धतीने व पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांना दूर ठेवून या मिशनची सूत्रे हलविली. मुंबईत जाऊन शिवसेनेच्या नेत्यांच्या कायम संपर्कात राहून ‘ऑपरेशन शिवधनुष्य’साठी सुरुवात करत, भाजपच्या अनेक नगरसेवकांना शिवसेनेत आणण्यासाठी गुप्त बैठका घेत कायम संपर्क ठेवला.

२. कुलभूषण पाटील, बंडखोर नगरसेवक, भाजप

शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख व मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपवासी झालेले कुलभूषण पाटील या शिवधनुष्य मिशनमधील एक मास्टरमाइंड असल्याचे बोलले जात आहे. कुलभूषण पाटील यांनी गेल्या महिन्यात मुंबईत जाऊन मिलिंद नार्वेकर यांची भेट घेऊन, भाजपमध्ये बंडखोरी होऊ शकते, असे सांगितले. तसेच अनेक दिवस पक्षातील नाराज नगरसेवकांची मोट बांधून शिवसेना नेत्यांच्या कायम संपर्कात राहून काम केले.

३. गजानन मालपुरे, माजी महानगरप्रमुख, शिवसेना

महापालिकेच्या राजकारणापासून दूर, मात्र शिवसेनेच्या संघटनेत कार्यरत असलेले शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे हेदेखील या ऑपरेशनमधील सूत्रधार आहेत. एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी कायम संपर्कात राहून मनपातील सत्ताधारी भाजपच्या नाराज नगरसेवकांना जवळ करण्यात मालपुरे यांचाही मोठा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुलभूषण पाटील व गजानन मालपुरे यांनीच असंतुष्टांना जवळ करत, ‘ऑपरेशन शिवधनुष्य’ची मोट बांधली आहे.

Web Title: Six people devised a strategy for 'Operation Shivadhanushya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.