जळगाव : शुक्रवारी दोन हजार रुपयांची घसरण झालेल्या चांदीच्या भावात शनिवार, १८ सप्टेंबर रोजी पुन्हा एक हजार रुपयांची घसरण झाली. या घसरणीमुळे चांदी ६१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली आहे. सोन्याचे भाव मात्र ४७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहेत.
गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात घसरण सुरूच आहे. यामध्ये शुक्रवार, १७ सप्टेंबर रोजी चांदीच्या भावात दोन हजार रुपयांची घसरण होऊन ती ६२ हजार ५०० रुपयांवर आली होती. या सोबतच सोन्यातही ५५० रुपयांची घसरण होऊन ते ४७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. शुक्रवारच्या घसरणीनंतर सलग दुसऱ्या दिवशी, शनिवारी चांदीत पुन्हा घसरण झाली. एक हजार रुपयांच्या घसरणीमुळे चांदी ६१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. सोने मात्र स्थिर आहे.
डॉलरचे दर वाढूनही घसरण
सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा परिणाम होत असतो. यामध्ये अमेरिकन डॉलरचे दर वाढल्यास सोने-चांदीचेही भाव वाढतात. मात्र, शनिवारी डॉलरच्या दरात १६ पैशांनी वाढ होऊन डॉलर ७३.७० रुपयांवर पोहोचला, तरीही चांदीत मात्र एक हजार रुपयांची घसरण झाली.
खरेदीपेक्षा विक्री अधिक
आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीची मागणी कमी झाली आहे, तसेच कमॉडीटी बाजारात चांदीच्या विक्रीचे प्रमाण वाढल्याने चांदीच्या भावात घसरण होत असल्याचे सांगितले जात आहे. तसे पाहता, जुलै-ऑगस्ट हा सुवर्ण व्यवसायातील मंदीचा काळ संपला असला, तरी सोने-चांदीच्या भावात वाढ होण्याऐवजी घसरण होत असल्याचे काही दिवसांपासून दिसून येत आहे.