विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : श्री संत मुक्ताबाई ७२४वा अंतर्धान समाधी सोहळा दि.१७ मे रविवारी येत असून कोरोना संकटामुळे परंपरा खंडित होऊ नये म्हणून यावर्षी प्रथमच संत नामदेव महाराज वंशज ह.भ.प.केशवदास नामदास महाराज पंढरपूर येथील संत मुक्ताबाई मठातून मुख्य सोहळा गुलालाचे कीर्तन करतील व भाविकांनी आपल्या घरुनच फेसबुकवर या लाईव्ह कीर्तनाचा लाभ घेत दुपारी १२.३० वाजता पुष्पवृष्टी करावी.वैशाख कृष्णपक्ष दशमीला दरवर्षी संत मुक्ताबाई अंतर्धान सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. परंतु ह्यावेळी कोरोना पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात १० मेपासून दररोज ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन, हरिपाठ, काकडा, प्रवचन आदी कार्यक्रम नित्यनियमाने कोथळी- मुक्ताईनगर येथे सुरू आहेत.तसेच संस्थानाचे आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य भाविक आपले घरीच पारायण करीत सोहळ्यात सहभागी झालेले आहेत.येत्या रविवारी मुख्य सोहळा होईल. सकाळी ६ वा. महापूजा अभिषेक, ७ वा. संत मुक्ताबाई विजय ग्रंथाचे पारायण व दु.११ ते १२:३० समाधी सोहळा गुलालाचे कीर्तन, पुष्पवृष्टी व आरती होईल.संत नामदेव महाराज विद्यमान वंशज ह.भ.प.केशवदास नामदास महाराज हे पंढरपूर येथील संत मुक्ताबाई मठात शासकीय निर्देशानुसार गुलालाचे कीर्तन करतील. त्याचे लाईव्ह प्रसारण ११ वाजेपासून फेसबुकवर संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर या पेजवर करण्यात येईल.तरी वारकरी भाविक भक्तांनी आपल्या घरीच राहून लाईव्ह कीर्तनाचा लाभ घ्यावा व सोहळा साजरा करावा, असे आवाहन संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील व विश्वस्त मंडळाने केले आहे.मेहुणलाही सोहळाश्रीसंत आदिशक्ती मुक्ताई यांच्या तिरोभूत (गुप्त) होण्यास यंदा ७२३ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा श्रीक्षेत्र मेहुण येथे संत मुक्ताई गुप्तदिन सोहळा होणार नसून, त्याऐवजी वैशाख वद्य दशमी, रविवार, दि. १७ मे रोजी दुपारी बारा वाजता सर्व भाविक भक्तांनी आपापल्या घरी मुक्ताई शरणम जप करावा, असे आवाहन श्रीसंत मुक्ताई देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
श्री संत मुक्ताबाई अंतर्धान सोहळा रविवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 14:37 IST
ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन, हरिपाठ, काकडा, प्रवचन आदी कार्यक्रम नित्यनियमाने कोथळी- मुक्ताईनगर येथे सुरू आहेत.
श्री संत मुक्ताबाई अंतर्धान सोहळा रविवारी
ठळक मुद्देपंढरपूर येथील मुक्ताबाई मठातून नामदास महाराज गुलालाचे कीर्तन करणार लाईव्ह प्रक्षेपण फेसबुकवरभक्तांनी आपापल्या घरी मुक्ताई शरणम जप करावा