सेनेचे गटनेते अनंत जोशी यांचे आव्हान : न केलेल्या कामांचा आमदार पिटताहेत डंका
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराचे आमदार सुरेश भोळे हे शहरात त्यांनी न केलेल्या कामांचा डंका पिटून फुकटचे श्रेय घेत आहेत. आमदार सुरेश भोळे यांनी कोरोनाकाळात जळगावकरांसाठी कोणतेही भरीव काम केले नसतानाही, आमदार भोळे जाहिरात करून, भरीव कामगिरी केल्याचा डंका पिटत आहेत. आमदार भोळे यांनी जर कोरोना काळात भरीव कामगिरी केली असेल, तर ती कामगिरी दाखवून माझ्या थोबाडीत मारून जा, असे खुले आव्हान शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी भाजपला दिले आहे.
अनंत जोशी यांनी बुधवारी मनपा विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जोशी यांनी आमदार सुरेश भोळे यांनी एका जाहिरातीत शहरातील विविध कामे आपल्या कार्यकाळात झाल्याचा दावा केला होता. मात्र, हा दावा फोल असून, इतरांच्या कार्यकाळात मंजूर झालेले व माजी महापौर ललित कोल्हे, नितीन लढ्ढा यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचे श्रेय आमदार भोळे घेत असल्याचा आरोप अनंत जोशी यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. आमदार भोळे यांनी इतरांनी केलेल्या कामांचे श्रेय घेऊ नये, आपण काहीतरी कामे करून दाखवावीत, असेही जोशी यांनी सांगितले.
मेहरूण तलावासाठी आणलेल्या निधीची तारीख सांगावी
शहरातील मेहरूण तलावाच्या सुशोभीकरणासाठी आमदार भोळे यांनी ११ कोटींचा निधी मिळवून दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र, मेहरूण तलावातील पिचिंगची कामे असो वा इतर कोणतीही कामे, ही तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे झाली. तर, इतर कामे माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या कार्यकाळात पूर्ण झाली. मात्र, केवळ फसवेगिरी व जाहिराती करून नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम आमदार करत असल्याचा आरोप जोशी यांनी केला. यांसह शहरातील घंटागाड्यांसाठी देखील २०१७ मध्ये नितीन बरडे, सुनील महाजन यांनी पाठपुरावा करून, नितीन लढ्ढा यांच्या कार्यकाळात निधी मंजूर झाल्याचा दावा जोशी यांनी केला आहे.