यावल : तालुक्यातील किनगाव येथील बसस्थानकावरील दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. यात रोख रकमेसह २२ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविला. याबाबत यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील किनगाव येथील राजू कडू लोहार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, किनगाव बसस्थानकावर त्याचे हॉटेल व शिव पान सेंटर असे पान मसाला दुकान आहे. गुरुवारी सायंकाळी दुकान बंद केल्यानंतर शुक्रवारी पहाटे पाच वाजता दुकान उघडण्याकरिता गेलो असता दुकानाचे शटर वाकविलेले दिसले. यावेळी दुकान उघडून आत पाहिले असता, दुकानातील सामान व गल्ला पेटीतील रोख रक्कम दिसून आले नाही. तसेच दुकानातील सिगारेटचे पाकीट व इतर शीतपेय चोरी गेल्याचे निदर्शनास आले. तेव्हा यावल पोलिसांना माहिती दिली व पंचनामा केल्यानंतर दुकानातून २० हजार रुपये किमतीचे सिगारेट पाकीट व शीतपेय आणि दोन हजार २०० रुपयांची रोकड असे एकूण २२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहायक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार सुनील तायडे करीत आहेत.