भुसावळ : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मंगळवारी शिवसेनेतर्फे निषेध करण्यात आला, तर दुसरीकडे नारायण राणे यांच्या समर्थनार्थ भाजपही आक्रमक होत ठिकठिकाणी भाजपने रास्ता रोको आंदोलन केले.
रावेर येथे तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. मुक्ताईनगर येथे शिवसेनेतर्फे प्रवर्तन चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. बोदवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावल येथे शिवसैनिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. येथील भुसावळ टी पॉईंटवर घोषणा देत राणे यांचा पुतळा दहन करण्यात आला. वरणगाव, ता. भुसावळ येथे मंत्री नारायण राणे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून येथील बसस्टँड चौकात शिवसेनेच्या वतीने त्यांचा पुतळा जाळून व कोंबड्या उडवून घोषणाबाजीसह निषेध करण्यात आला.