लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत नेहमी सत्ताधारी भाजपला शहरातील समस्यांबाबत घेरणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी शुक्रवारी महासभा सुरु होण्याआधी महापौर भारती सोनवणे यांना आश्चर्याचा धक्का दिला. महापौरांच्या कार्यकाळातील ही अखेरची महासभा असल्याने व त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध कामांबाबत शिवसेना नगरसेवकांकडून महापौरांचा जाहीर सत्कार करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात महापौरांचे स्वागत करण्यात आले. तसेच फेटा घालून, महापौरांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून महासभा सुरु होण्याआधी सभागृहातच सत्कार केला.
१८ मार्च रोजी महापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपणार असून, शुक्रवारी झालेली महासभा ही कदाचित महापौर म्हणून भारती सोनवणे यांनी अखेरची महासभा राहण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेना नगरसेवकांकडून कोणतेही पुर्वसूचना न देता, अचानकपणे महापौरांचा सत्कार करण्याचे नियोजन केले होते. महापौरांचे आपल्या दालनात आगमन झाल्यानंतर ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. अचानकपणे केलेल्या या नियोजनाचा महापौरांसह भाजपच्या सर्वच नगरसेवकांना आश्चर्याचा धक्का बसल्याचे पहायला मिळाले.
विरोधकांकडून पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांचा कामांसाठी सत्कार
महापालिकेत गेल्या अडीच वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. या कार्यकाळात शहरातील समस्यांबाबत शिवसेनेकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आरोप केले जातात. मात्र, मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाकडून सत्ताधारी महापौरांचा त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामांबाबत जाहीर सत्कार केल्याची ही पहिलीच वेळ आहे.
सुप्रीम कॉलनीतील कामाच्या पाठपुराव्यामुळे सत्कार
शहरातील सुप्रिम कॉलनीतील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी केलेला पाठपुरवठा, त्यातच सुप्रिम कॉलनीतील तीन्ही नगरसेवक शिवसेनेचे असतानाही अमृत योजनेचे काम या भागात पहिल्यांदाच पुर्ण केल्याने महापौरांचा हा सत्कार करण्यात आला आहे. शिवसेना नगरसेवकांकडून महापौरांना सन्मानपत्र देखील देण्यात आले असून, यामध्ये महापौरांनी कोरोना काळात केलेली कामे व दाखविलेली तत्परता, शहरात लावण्यात आलले एलईडी, सागर पार्क मैदानावरील जॉगींग ट्रॅक या कामांसाठी महापौरांचे कौतुक केले आहे. दरम्यान, या सत्कारामुळे पुढील काळात होणाऱ्या राजकीय घडामोडींवर देखील परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.