जळगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याने याचे तीव्र पडसाद खान्देशातही उमटले. मंगळवारी धुळे येथे शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने- सामने आले व दगडफेकही झाली. यामुळे पोलिसांना सोम्य लाठीचार्ज करावा लागला.
धुळे जिल्हा शिवसेनेच्यावतीने राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयासमोर केले. यावेळी दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू असताना तुरळक दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत गर्दी पांगविली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल शिवसैनिकांनी दिलेल्या
फिर्यादीवरुन राणे यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहे. जिल्ह्यात शिवसेनेतर्फे पिंपळनेरला रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. साक्रीतही राणेंच्या पुतळ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदविण्यात आला.
दोंडाईचातदेखील राणेंच्या प्रतिमेवर शाई फेकून निषेध नोंदविण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना आक्रमक
राणे यांच्या वक्तव्याचे नंदुरबार
जिल्ह्यातही पडसाद उमटले
नंदुरबारात युवा सेनेतर्फे नारायण राणे यांच्याविरोधात घोषणा देत आंदोलन
करण्यात आले. शहाद्यात शिवसेनेतर्फे जोडे मारो आंदोलन करून नारायण राणे यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचे निवेदन पोलिसांना देण्यात आले. तळोद्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मंत्री राणे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
राणे यांच्याविरुध्द जळगावातही गुन्हा दाखल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्याविरुध्द मंगळवारी
जळगाव येथे दुपारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापौर जयश्री महाजन यांनी फिर्याद दिली आहे. राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जळगाव शहरातही तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात जाऊन कोंबड्या फेकून आंदोलन केले. त्यानंतर महापौरांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील पहूर (ता. जामनेर) येथे शिवसैनिकांनी पहूर-औरंगाबाद मार्ग जवळपास अर्धा तास रोखून धरला होता. त्यामुळे दोन्ही बाजूला मोठी वाहतूक कोंडी झाली होती. चाळीसगाव येथे पोलिस ठाण्यात कोंबड्या देऊन शिवसेनेने अनोखे आंदोलन केले. अमळनेर, पाचोरा आदी ठिकाणीही आंदोलने करण्यात आली तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
भुसावळ येथेही शिवसेनेतर्फे राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला. रावेर येथे तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. मुक्ताईनगर येथे शिवसेनेतर्फे प्रवर्तन चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. बोदवड येथेही राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. यावल येथे राणे यांचा पुतळा दहन करण्यात आला. वरणगाव, ता. भुसावळ येथे बसस्टँड चौकात शिवसेनेच्या वतीने राणेंचा पुतळा जाळून व कोंबड्या उडवून घोषणाबाजीसह निषेध करण्यात आला.