जळगाव : शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ७५ कोटींचा सफाईचा मक्ता देवूनही स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला नाही म्हणून बुधवारी शिवसेना महानगरच्यावतीने मनपावर धडक मोर्चा काढत मनपा आयुक्तांना गाजरं भेट दिली. तसेच लवकरात लवकर कचºयाचा प्रश्न मार्गी न लावल्यास शहरातील सर्व कचरा मनपा आवारात फेकण्याचा इशारा दिला आहे.शिवसेनेकडून दुपारी १२ वाजता जयकिसनवाडी भागातून महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. महापालिकेत हा मोर्चा पोहोचल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांना गाजरे भेट दिली.मनपा प्रशासनाकडून ७५ कोटी रुपयांचा मक्ता देवून नागरिकांना स्वच्छतेच्या नावावर गाजरंच दिली असल्याने शिवसेनेकडूनही मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे, उपायुक्त दंडवते व आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांना गाजरांची भेट देण्यात आली.यावेळी शिवसेना पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. या आंदोलनात महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहानगरप्रमुख विलास भदाने, विधानसभा संपर्क प्रमुख समाधान पाटील, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शहर संघटक दिनेश जगताप, नगरसेवक नितीन बरडे, अमर जैन, ज्योती तायडे, जितेंद्र मुंदडा, प्रशांत नाईक, शंतनू नारखेडे, चिंतामण जैतकर, अंकुश कोळी, प्रकाश जैन-बेदमुथा यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.१५ नोव्हेंबरनंतर प्रश्न मार्गी लावूआतापर्यंत कचºयाचा समस्यांबाबत गंभीर दखल घेवून मक्तेदाराला वेळोवेळी नोटीस देवून, त्यांच्याकडून दंड देखील वसूल करण्यात आला आहे. तरी पुन्हा त्यांना सूचना देवून १५ नोव्हेंबरनंतर शहरातील कचºयाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.मक्तेदाराकडून या कामात हलगर्जीपणा केला तर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी दिले.सतरा मजलीच्या बाहेर येवून जरा शहरात चक्कर माराकचºयाचा समस्येबाबत सत्ताधाºयांपासून विरोधक व नागरिक देखील तक्रारी दाखल करत असताना मनपा प्रशासन झोपेतून उठताना दिसून येत नाही. प्रत्येक गल्ली-चौकात कचºयाचे ढीग जमा झाले असून, जरा सतरा मजलीच्या बाहेर येवून शहरात चक्कर मारा आणि समस्या पहा असा सल्ला मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी उपायुक्त व आरोग्य अधिकाºयांना दिला. स्वच्छतेच्या इतक्या तक्रारी असून देखील मक्तेदाराला १ कोटी ३६ लाख रुपयांची बिले अदा करण्यात आली. त्याचे इतके लाड कशासाठी असा सवालही पदाधिकाºयांनी केला.शाहू नगरातील रहिवाश्यांचाही मनपावर मोर्चाशाहुनगरात गटारींचे पाणी रस्त्यावर येत आहे. या भागात मनपाकडून साफसफाई केली जात नाही, वारंवार निवेदने देवून तक्रारी करुनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने शाहू नगरातील नागरिकांनी बुधवारी महापालिकेवर मोर्चा काढला. तसेच समस्यांचा नागरिकांनी आयुक्तांसमोर समस्यांचा पाढा वाचला. या नागरिकांना देखील आयुक्तांनी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी हाजी मुन्ना, नजमोद्दीन शेख, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष बांगी याकुब, अफरोज बागवान, अंजली चव्हाण, पार्वताबाई देवरे यांच्यासह शाहुनगरच्या नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असून प्रत्येक प्रभागात वाईट अवस्था आहे, त्यामुळे डेंग्यू सारख्या आजारांचे रुग्ण वाढू लागले आहेत.
कचऱ्याच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 14:58 IST